23 January, 2010

चकवा :P

मी शाळेत असतानाची गोष्ट. नववीतली. मी तेव्हा सकाळी बाबांसोबत आजीकडे यायचे आणि मग तिथेच थांबून दुपारी शाळेत चालत जायचे. रेणुका स्वरूप मध्ये आजीच्या घरून म्हणजे सदाशिव पेठेतून जाण्यासाठी एक टिळक रोड सोडून बाकी काही माहित असण्याची गरज नसल्यामुळे मला बाकीचे रास्ते माहित असायचा प्रश्नच नव्हता ! नाही म्हणायला तुळशीबागेतले सगळे रास्ते आणि गल्लीबोळ माहित होते म्हणा. पण कोणी मैत्रीण कोथरूडहून येते म्हणजे नक्की कुठून येते वगैरे प्रश्नांशी माझा काही संबंधंच नसायचा. एव्हढंच काय, माझी अगदी खास मैत्रीण शानिपारापाशी राहते हे मला माहित असलं तरी मला शाळेतून तिच्या घरी एकटीला जायला रस्ता कधीच सापडायचा नाही. रस्त्यांच्या बाबतीत माझं घोर अज्ञान आहे हेच खरं! म्हणजे तो चकवा असतो ना.. की एखाद्या वळणावर उगीचच आपल्याला भासवतो की आता वळायचं आहे, तसं मला प्रत्येक वळणावरच वाटतं. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे, मी खूप वर्ष आई किंवा बाबांबरोबर ठिकठिकाणी गेलीये. थोडक्यात एकटीनं नाही. त्यामुळं, रस्ते लक्षात न ठेवण्याचीच सवय लगेच लागली. अकरावीत जेव्हा बस ने स.प. ला जायला लागले तेव्हा कुठं मला रस्त्यांचं "भान" आलं. मग गाडी वापरू लागल्यावर तर ते ज्ञान जरा अधिकच वाढलं. असो.

तर नववीत असताना NCC साठी आम्ही सगळे सेनापती बापट रोड च्या सिम्बायोसिस च्या ग्राउंड वर जायचो. तिकडे बसने जा - ये करायचो. पण सगळे एकत्र असायचे, शाळेत भेटून मग तिकडून शनिपार च्या बसस्टोप वर आणि तिकडून बस - असंच परतताना. त्यामुळे मी रस्ते लक्षात ठेवलेच नाहीत कधी. एकदा कुठल्याशा परीक्षेसाठी कि काहीतरी म्हणून मला तिकडून लवकर निघावं लागलं. मी आत्मविश्वासाने (!) रिक्षापेक्षा बसनेच यायचं ठरवलं. बस मिळून शनिपार गाठलं देखील. आणि निघाले शाळेकडे. नेहमीप्रमाणे चकवा लागला :) प्रत्येक वळणावर वाटायचं, आरे इकडे वळलं की शाळेचा रोड येतो का? कि नाही, इकडे वळलं की माझ्या मैत्रिणीचं घर येतं वाटतं..असं करत करत चुकून एका ठिकाणी वळलेच मी ! पोहोचायला उशीर होईल असं वाटायला लागलेलं. वाटलं सरळ रिक्षा करावी. पण मग मला वाटलं, शाळा जवळच असेल कुठेतरी तर कशाला उगीच पैसे घालवा! :D एका बाईंना शेवटी विचारलं - अहो इथून रेणुका स्वरूप ला कसं जायचं? त्यांनी हसतच सांगितलं. काय करणार! हसणं सहन करावं लागलं.. त्या तरी काय करणार! मी शाळेच्या गणवेशातच माझी शाळा कुठंय असं लोकांना विचारत होते!

असंच एकदा सातवीत असतानाची गोष्ट - आत्याने मला कसलीतरी स्पेशल नानकटाई किंवा काहीतरी आणायला "रिगल" बेकरीमध्ये पाठवलं होतं. "रिगल" ची स्पेशालिटी होती ती. चिमणबागेतून टिळक रोडला लागलं की डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा २ बेकरी होत्या. डावीकडं "सई बेकरी", उजवीकडं "रिगल बेकरी". मी निघताना लगेच पिशवी आणि पैसे घेवून पळत सुटले. चिमणबागेतून टिळक रोडला लागले आणि चकवा लागला. डावीकडचीच "रिगल" असं मनानं पक्कं सांगितलं आणि मी डावीकडं वळाले. तिकडं गेल्यावर दिसली "सई". म्हटलं, चालतंय - बेकरी ती बेकरी! पण तिकडे ती स्पेशल नानकटाई नव्हतीच! :( झालं! म्हटलं आता दुप्पट चालावं लागणार. एवढं कमी कि काय म्हणून माझा आत्तेभाऊ बसस्टोप वर भेटला. त्याला म्हटलं नानकटाई आणायला पाठवलंय मला. मग झाले त्याचे प्रश्न सुरु - इकडे कुठे आलीएस मग? "रिगल" तर तिकडे आहे ना! वगैरे वगैरे. मी मग कबूल करून टाकलं त्याच्याकडे की - हो, मी "सई" लाच "रिगल" समजले. गोंधळ झाला. झालं! त्याला आयतं कारणं मिळालं हसायला. वर उशीर झाला म्हणून घरी "गर्दी" होती बेकरीत असं सांगावं लागलं ते वेगळंच!

2 comments:

Alhad Mahabal said...

पुण्यातला माझा भूगोल माझ्या काकाच्या घरापासून, चितळे, विश्रामबागवाडा आणि वळून आप्पा बळवंत चौकात संपतो...

तरीही चकवा वाचताना मजा आली!
:)


alhadmahabal.wordpress.com
आम्हा वर्डप्रेसवाल्यांनाही डायरेक्ट कमेंट करू द्या की!

हेरंब said...

हा हा .. चकवा वाचून मजा आली. आम्हाला फक्त ट्रेकलाच चकव्यांची सवय आहे. रस्त्याने चालतानाही ते लागतात हे वाचून मस्त वाटलं :)