11 May, 2010

"ठिकरी"

व. पु. म्हटलं की खरंतर मी जरा धाकधुकीनच पुस्तक हातात घेते; कारण त्याचं लिखाण (मी जेवढं वाचलंय तेवढं) मला extreme वाटतं. म्हणजे "एक घाव दोन तुकडे" प्रकारचं. पण "ठिकरी" सकाळी हातात घेतलं आणि तासाभरात बघता बघता संपलंदेखील! पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं बोलकं! नेहमीप्रमाणे आधी पुस्तकाच्या मागच्या बाजूला पुस्तकातला एखादा परिच्छेद असतो तो वाचायला घेतला. तेव्हा कळलं की ही ठिकरी म्हणजे मला माहित असलेल्या टिपऱ्यांच्या खेळातली "टिपरी" - जिला खेळवणारा कोणी वेगळाच असतो; ती आपली या चौकोनातून त्या चोकोनात पडत जाते! म्हटलं तसं, पुस्तक हातात घेतल्यावर खाली ठेववेना. खरंतर स्त्रीप्रधान म्हणता येईल अशीच एक साधीशी गोष्ट! पण व. पुं.ची लेखणी लागल्यामुळे खूपच वेगळी वाटते. कित्येकदा अशी स्त्रीप्रधान / स्त्रीयांच्या प्रश्नांबाबत बोलणारी / त्यांच्या अत्याचाराला वाचा फोडणारी पुस्तक किंवा सिनेमे पाहून मला वाटतं की एखाद्याच्या आयुष्यात "सगळं कसं छान जुळून आलंय" म्हणतात त्याप्रमाणे एखादीच्या आयुष्यात "सगळंच कसं विपरीत घडत गेलं" असा कसं काय असू शकत - असा प्रश्न पडतो. अशा वेळेस गोष्टीपुरत का होईना "नशीब!" एव्हढं एकच उत्तर सापडतं! उदाहरणादाखल याच पुस्तकातलं एक वाक्य: "लग्नानंतर वेगवेगळे उपाय करूनही अनेकांच्या घरात पाळणे हलत नाहीत. पण असे हे अत्याचार झाले की हमखास अपत्याचं आगमन व्हायलाच हवं का? फसवणूक झाली म्हणजेही हाच अनुभव येतो."

असो!

शीर्षक: ठिकरी
लेखक: व. पु. काळे
प्रकाशन: मेनका
किंमत: ३०/- फक्त
पाने: ११०

10 May, 2010

राज्य-परिवहन मंडळाचा...!

आज सोमवार. मी मुंबईच्या (बोरीवली एशिआड बस) सकाळी ७ च्या गाडीचं आरक्षण करून ठेवलेलं शनिवारीच. सहा वाजून ४० मिनिटांनी मी बसथांब्यावर पोहोचले. पाहते तर एक बोरीवली आधीच येवून थांबलेली. म्हटलं, वाह! आज काय नशीब जोरावर आहे! ७ ची क्वचितच ७ ला येणारी गाडी आज चक्क २० मिनिटं आधी! धावत जाऊन त्या कंडक्टर मुलीला विचारलं, "७ ची बोरीवली ना?"
ती म्हणे - "७ ची लागेल इथे शेजारीच."
(मी मनात) - तरीच! एवढी लवकर कशी काय! तरी एकदा खात्री करून घ्यावी..!
मी लगबगीनं ते announce करणारे बसलेले असतात, त्यांना गाठलं.
"७ ची बोरीवली? लागलीये का?"
"७१०६.. नंबर आहे, बघा लागली असेल तर"
ऐकताचक्षणी मी धावत परत आले, म्हटलं ह्या लागलेल्या बसचा नंबर बघावा आधी! तर तो काहीतरी ८२xx होता. म्हटलं, जाऊ देत! थांबा आता ७१०६ ची वाट बघत. तसंही अजून ७ वाजायचे होते!

वेळ: ७.१५
(मी मनात) अजून कशी आली नाही बस? माझं घड्याळ मेलं एक नेहमी पुढं असतं. नक्की किती वाजलेत कोण जाणे!
हळूच शेजारच्याच घड्याळ दिसतंय का, प्रयत्न केला बघायचा - अरे! झालेत की सव्वा सात खरंच.
मी शेजारच्या वेदांतच्या आईला (मगाशी तो रडताना त्याच्या आईने "वेदांत, इथे ओरडायला लावू नकोस" म्हणून एक धपाटा घातलेला होता त्याच्या पाठीत :() - तुमची बस कोणती?
त्या: पावणे सात ची मुंबई सेन्ट्रल. लेट आहेत गाड्या म्हणे आज! तुमची?
मी: बोरीवली, ७ ची. हो ना! फारच उशीर झाला! पावणे सात म्हणजे!
(मी मनात) चला पावणे सातवाले लोकदेखील अजून थांबलेत.. असू देत..असू देत.. येईल हो बस!
तरी राहवेना, एकदा पुन्हा announcer कडे जाऊन -
"काय हो, ७ ची बोरीवली - ७१०६ लागली का?"
तिसराच एक माणूस : "ओ, हे तिकीट जरा adjust करून द्या हो.. सोलापूरचं आहे.."
announcer त्या माणसाला : बघू? मगाचपासून ३ वेळा ओरडलो होतो इथून, तेव्हा नाही गाडीत येवून बसायचं? आता आलेत adjust करायला!
मी : अहो काका, ७ ची बोरीवली...?
तो माणूस : केव्हा? बस लागलेलीच नाही आणि काय म्हणता तुम्ही?
announcer त्या माणसाला : काय बस लागली नाही? अं? कधीच लागली बस.. त्यानंताराचीसुद्धा एक गेली.
तो माणूस : कधी? अजिबात बस लागलेली नाही platform लाच!
मी (मध्येच) : ७१०६, तुम्ही म्हनालेलास ना हा नंबर?
announcer त्या माणसाला : खोटं बोलू नका. (register दाखवत) बघा, ७५३३.. केव्हाच लागली आणि सुटलीपण. त्यानंतरची हि ७६१२ बघा सव्वा सातला गेली ही पण.
तो माणूस : ओ, त्यांनी चढू दिलं नाही. इकडे adjust करायला आलो ना म्हणून तर!
announcer त्या माणसाला : मग खोटं का बोललात आधी? बस लागलीच नाही म्हणून? आणा हिकडं ते!
मी (पुन्हा एकदा मध्येच) : ओ काका, बोरीवली...
चौथाच माणूस : बोरीवली शिवनेरी साडे सातची लागली का हो?
announcer या नव्या माणसाला : हां.. ती आहे बघा तिकडे. (बोट दाखवत)
(मी मनात) बस! झाला एवढा अपमान (?) पुरे झाला! तडक तिकडून निघून आले. पुन्हा बस ची वाट बघत.

वेळ: ७.३०
एका निम-आराम २ x २ बोरीवलीच्या बसचं आगमन झालं! म्हटलं, यांना एकदा विचारून पाहू, बस लेट आहे तर नेतात का या तिकिटावर?
मी: ओ काका, ७ ची बोरीवली लेट आहे, या बस मध्ये adjust होईल का तिकीट?
कंडक्टर काका: काय? ७ ची? आहो, गेली असेल ती केव्हाच!
मी: नाही, मी पावणे सात पासून आहे इकडे. नाही आलेली बस. लेट आहे. बघा ना इकडे adjust होतंय का?
कंडक्टर काका: असं कसं? तिकडं विचारून या एकदा.. गेली असणार बस!

मी घाबरले, तडक announcer कडे -
मी : ७१०६, ७ ची बोरीवली लागली नाहीच का अजून? साडे सात होवून गेले की!
announcer : ती? ती गेली की ८२६० सोडली तिच्याऐवजी.
मी : कधी? तुम्ही तर ७१०६ सांगितलेलं. मी कधीची थांबलेय वाट बघत.
announcer : ओ नाही.. तीच्या ऐवजी सोडली. बघू तिकीट...
हा.. २४ नंबरचं सीट ना? मगाचपासून ३ वेळा ती मुलगी (कंडक्टर) येवून विचारून गेली, होता कुठं तुम्ही? ती बस गेली ७ लाच!
मी : (मनातच..) असं कसं शक्य आहे! मग मी मगाशी विचारलं तेव्हा? काय झोपा काढतात का ही लोक?
मी काकांना : मग आता? पुढची बस कितीला आहे?
announcer : आता ८ ला आहे बघा. मी इकडे लिहून देतो. तिकिटाच्या माग.. ८ ची पकड आता!
मग त्याने "पुढील बसमधून प्रवासदर वजावळ" असं काहीतरी तिकिटावर (माग) लिहून मला उपकृत केलं.

मी धावत त्या बसपाशी आले.
मी : ओ काका, ती बस खरंच गेली! या बस मध्ये करा की adjust ! लिहून आणलंय तसं.
काका : नाही अहो, ही extra गाडी आहे. यात reservation adjust होत नसतं.
(मग तिकीटाकडे पाहून) - शिक्का नाहीये आणि यावर!

(आता मला काय स्वप्न पडलेलं की तो माणूस adjust केलं तिकीट की शिक्का देखील मारतो? सही तर त्याने केलेलीच!)

मी पुन्हा announcer कडे. या वेळेस वेगळाच माणूस होता! त्याला direct म्हटलं, "ओ, यावर शिक्का नाहीये". त्यानेदेखील काही न बोलता मारला शिक्का. :-o


मी पुन्हा त्या बसपाशी. बस जवळजवळ निघण्याच्या बेतात.
"ओ काका, आहे आता शिक्का, करा की adjust!"
"आवो, नाही होत extra गाडीला.."
"बर! मग याचं तिकीट किती?"
"१५०.. कशाला पण? येईल न ८ ला पुढची गाडी.. का उगीच ५ मिनिटासाठी?"
असं म्हणून त्याने गाडीचं दार बंदच केलं direct!

वेळ: ८.२०
मी जवळजवळ रडकुंडीला! बस न मिळण्यापेक्षा पैसे वाया जाताहेत की काय? या कारणानेच जास्त! हे तिकीट वाया गेला तर? पुन्हा १५०! नाहीSSSS...वगैरे!
तेवढ्यात कुठूनतरी "दादर चला दादर" अशी हाक ऐकू आली. मी direct चढलेच त्या बस मध्ये. मग त्या कंडक्टर ला (हो, हा काकाच्या वयाचा नवता :D) म्हटलं - "दादर? कितीची आहे? ८?"
तो : "नाही. ही extra आहे"
मी (मनात) : कर्म माझं!
पण मी almost त्या बस मध्ये जाऊन चढलेच होते. म्हणून मग...
मी त्याला : माझं हे तिकीट adjust ...
(पुढे काही बोलण्याआधीच..)
तो : तू आधी बसून घे. नंतर जागा मिळायची नाही.
मी (मनात) : पण आधी तिकिटाच विचारू.. नंतर म्हणेल नाही होणार adjust!
मी त्याला : नाही, पण हे extra गाडी..?
तो (पुन्हा) : आधी बस पाहू. तिकडं माग जागा आहे.
मी बसले एकदाची. मनात धाकधुक होतीच, म्हटलं, नंतर म्हणायचा - आधी का सांगितल नाही? आता दे तिकिटाचे पैसे!
पण नंतर मात्र त्याने अजिबात पैसे वगैरे मागणं तर सोडाच! पण तिकीट नुसता पहिला आणि विचारलं - की कधीची बस होती? - बस, एव्हढंच!
गेल्या दिड तासात मी पहिल्यांदा "हुश्श" केलं असेल! हा आत्ताचा कंडक्टर आणि ते मगाचचे २-३ जण सगळी राज्य-परिवहन मंडळाचीच माणस! पण केव्हढा फरक!