23 January, 2010

चकवा :P

मी शाळेत असतानाची गोष्ट. नववीतली. मी तेव्हा सकाळी बाबांसोबत आजीकडे यायचे आणि मग तिथेच थांबून दुपारी शाळेत चालत जायचे. रेणुका स्वरूप मध्ये आजीच्या घरून म्हणजे सदाशिव पेठेतून जाण्यासाठी एक टिळक रोड सोडून बाकी काही माहित असण्याची गरज नसल्यामुळे मला बाकीचे रास्ते माहित असायचा प्रश्नच नव्हता ! नाही म्हणायला तुळशीबागेतले सगळे रास्ते आणि गल्लीबोळ माहित होते म्हणा. पण कोणी मैत्रीण कोथरूडहून येते म्हणजे नक्की कुठून येते वगैरे प्रश्नांशी माझा काही संबंधंच नसायचा. एव्हढंच काय, माझी अगदी खास मैत्रीण शानिपारापाशी राहते हे मला माहित असलं तरी मला शाळेतून तिच्या घरी एकटीला जायला रस्ता कधीच सापडायचा नाही. रस्त्यांच्या बाबतीत माझं घोर अज्ञान आहे हेच खरं! म्हणजे तो चकवा असतो ना.. की एखाद्या वळणावर उगीचच आपल्याला भासवतो की आता वळायचं आहे, तसं मला प्रत्येक वळणावरच वाटतं. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे, मी खूप वर्ष आई किंवा बाबांबरोबर ठिकठिकाणी गेलीये. थोडक्यात एकटीनं नाही. त्यामुळं, रस्ते लक्षात न ठेवण्याचीच सवय लगेच लागली. अकरावीत जेव्हा बस ने स.प. ला जायला लागले तेव्हा कुठं मला रस्त्यांचं "भान" आलं. मग गाडी वापरू लागल्यावर तर ते ज्ञान जरा अधिकच वाढलं. असो.

तर नववीत असताना NCC साठी आम्ही सगळे सेनापती बापट रोड च्या सिम्बायोसिस च्या ग्राउंड वर जायचो. तिकडे बसने जा - ये करायचो. पण सगळे एकत्र असायचे, शाळेत भेटून मग तिकडून शनिपार च्या बसस्टोप वर आणि तिकडून बस - असंच परतताना. त्यामुळे मी रस्ते लक्षात ठेवलेच नाहीत कधी. एकदा कुठल्याशा परीक्षेसाठी कि काहीतरी म्हणून मला तिकडून लवकर निघावं लागलं. मी आत्मविश्वासाने (!) रिक्षापेक्षा बसनेच यायचं ठरवलं. बस मिळून शनिपार गाठलं देखील. आणि निघाले शाळेकडे. नेहमीप्रमाणे चकवा लागला :) प्रत्येक वळणावर वाटायचं, आरे इकडे वळलं की शाळेचा रोड येतो का? कि नाही, इकडे वळलं की माझ्या मैत्रिणीचं घर येतं वाटतं..असं करत करत चुकून एका ठिकाणी वळलेच मी ! पोहोचायला उशीर होईल असं वाटायला लागलेलं. वाटलं सरळ रिक्षा करावी. पण मग मला वाटलं, शाळा जवळच असेल कुठेतरी तर कशाला उगीच पैसे घालवा! :D एका बाईंना शेवटी विचारलं - अहो इथून रेणुका स्वरूप ला कसं जायचं? त्यांनी हसतच सांगितलं. काय करणार! हसणं सहन करावं लागलं.. त्या तरी काय करणार! मी शाळेच्या गणवेशातच माझी शाळा कुठंय असं लोकांना विचारत होते!

असंच एकदा सातवीत असतानाची गोष्ट - आत्याने मला कसलीतरी स्पेशल नानकटाई किंवा काहीतरी आणायला "रिगल" बेकरीमध्ये पाठवलं होतं. "रिगल" ची स्पेशालिटी होती ती. चिमणबागेतून टिळक रोडला लागलं की डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा २ बेकरी होत्या. डावीकडं "सई बेकरी", उजवीकडं "रिगल बेकरी". मी निघताना लगेच पिशवी आणि पैसे घेवून पळत सुटले. चिमणबागेतून टिळक रोडला लागले आणि चकवा लागला. डावीकडचीच "रिगल" असं मनानं पक्कं सांगितलं आणि मी डावीकडं वळाले. तिकडं गेल्यावर दिसली "सई". म्हटलं, चालतंय - बेकरी ती बेकरी! पण तिकडे ती स्पेशल नानकटाई नव्हतीच! :( झालं! म्हटलं आता दुप्पट चालावं लागणार. एवढं कमी कि काय म्हणून माझा आत्तेभाऊ बसस्टोप वर भेटला. त्याला म्हटलं नानकटाई आणायला पाठवलंय मला. मग झाले त्याचे प्रश्न सुरु - इकडे कुठे आलीएस मग? "रिगल" तर तिकडे आहे ना! वगैरे वगैरे. मी मग कबूल करून टाकलं त्याच्याकडे की - हो, मी "सई" लाच "रिगल" समजले. गोंधळ झाला. झालं! त्याला आयतं कारणं मिळालं हसायला. वर उशीर झाला म्हणून घरी "गर्दी" होती बेकरीत असं सांगावं लागलं ते वेगळंच!

02 January, 2010

द्विधा

(काल्पनिक)

"मग आता तुझं शिक्षण संपल्यावर काय करणार तू?"

"काय म्हणजे काय? करेन जॉब नाहीतर पुढे शिकेन अजून.."

"काय पण म्हणजे?"

"बघू गं.. हे होऊ देत आधी.. तोवर ठरवेन मी.."

------------------------------------------------------------------------------------------------

"जॉब ना.. मला काही फरक पडत नाही फारसा.. पुण्यात मिळालं काय किंवा बाहेर जावं लागलं काय.. माझी तयारी आहे.. जोवर भारत सोडवा लागत नाहीये"

"हम्म.. मला माहितीये.. तुला पुण्याबाहेरचा का चालणारे ते.."

"अस्सं?"

"हम्म.. म्हणजे मग आत्याची भुणभुण नाही तुझ्यामागे लग्न कर लग्न कर.."

"हा! well.. that is like an additional thing.. a perk to me.. पण ते काही कारण नाहीये.. मला जिथे कुठे माझ्या करिअर साठी चांगली संधी मिळेल तिथे जायची माझी तयारी आहे.."

"हम्म.. समजतंय.."

""

------------------------------------------------------------------------------------------------

"हे बघ.. सगळं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं.. शिक्षण.. नोकरी.. लग्न.. मुलं-बाळं.. त्यांची शिक्षणं.. लग्न....."

"अगं बास.. कळलं.."

"कळलं नाही तुला.. कळतच तर नाहीये.. आता जे करायला हवं ते करत नाहीएस.. मनाप्रमाणे शिकू दिलं ना.. आता आमचंही ऐक जरा.."

"अगं पण.."

"पण बिण काही नाही.. आपण नाव तरी नोंदवू या.. मुलं बघू या तरी.. तुला पसंद नसेल तर आम्ही काही बळजबरी करणार आहोत का?"

"हा! ते शक्य नाही.. पण मी म्हणतेय.. कशाला हा अट्टाहास? मिळालं कोणी.. आवडलं कोणी.. करावसं वाटलं लग्न तर करावं.. उगीच काय!"

"पुन्हा तेच.. सांगितलं ना.. वेळच्या वेळी झालं की बरं असतं.. समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर काय!"

"बासच!"

""

------------------------------------------------------------------------------------------------

"अगं आत्या, आत्ता ही नाही नाही म्हणतेय.. बघ उद्या तुमच्यासमोर एखाद्याला आणून उभं करेल म्हणेल.. घ्या.. हा तुमचा होणारा जावई.."

"exactly! मी हेच सांगतेय तिला कि कोणी आवडला तर नक्की करेन.. पटलं पाहिजे न पण!"

""

------------------------------------------------------------------------------------------------

"तुझे बाबा आता रिटायर होतील.. काही वर्षांनी.. मग तू काय करणारेस?"

"म्हणजे?"

"अगं, म्हणजे मग काय पुढे?"

"एक मिनिट.. ते रिटायर झाले की ते काय करणारेत असं त्यांना विचारायचं का तुला? तू चुकून मला विचारतेयेस का?"

"अगं.. तुझंही शिक्षण होईल आता.. मग पुढं...."

"सांगितलं कि तुला.. जॉब किंवा पुढे शिकेन.. depends on what kind of opportunities I get.."

"तुझ्यासाठी मुलं बघायला लागायचं असं आम्ही ठरवलंय.."

""

"तुझ्याशी बोलतेय मी.."

"हो. ऐकलं.. ठरवलेय! मग ठीके! बघा"

"अरे वाह! चक्क तयार झालीस.."

"hello.. मी म्हटलं तुम्ही ठरवलंय तर बघा.."

"म्हणजे? लग्न काय आम्हाला करायचंय? आम्ही नाव नोंदवणार.. मुलगा तू पसंद केलास कीच पुढचं.."

"बरं.."

"अशी कशी ग तू.. तुझ्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली.. एवढंच काय.. तुझ्या सगळ्या लहान मोठ्या बहिणींची सुद्धा झालीएत.. लोकं आम्हाला विचारतात.."

"लोकांना नाहीत उद्योग.."

"हो तुलाच तेवढे उद्योग आहेत.. बाकी सगळे निरुद्योगीच आहेत.. तुलाच काय ते तेव्हढ कळतं.. बाकीच्यांना अक्कलच नाही ना.."

"आवरा!"

"............." (काही ना काही बोलणं चालू आहे..)

""

"............."

""

......

------------------------------------------------------------------------------------------------

"तुझी अशी इच्छा आहे का की या वयातही तुझ्या बाबांनी तुझ्या भविष्याची काळजी करत बसावं?"

"काळजी? कसली?"

""

"अगं.. कसली?"

""

"ओह.. लग्न and all? तेवढंच ध्येय आहे का आयुष्यात? की त्याचा विचार करत आत्ता समोर असलेली संधी दुर्लक्षित करायची?"

"अगं.. लग्न झालं की तुला काय कोंडून ठेवणारे का? कर ना नंतर.."

"शक्य नाही कोंडून ठेवणं.. पण प्रश्न हा आहे की का त्याच्या मागे लागलीएस हात धुवून.."

"आपण शेवटी मुलीकडचे आहोत.. उशीर झाला तर मग अपेक्षा कमी कराव्या लागतील.. हवा तसा मुलगा मिळणार नाही.."

"अपेक्षा.. नाहीच्चेत पण माझ्या काहीच.. बस वागायला बोलायला नीट असला.. समोरच्याला रिस्पेक्ट देणारा असला.. आणि चारचौघात तमाशा न करणारा असला की बास.. आणि जो समोरच्याच्या मतांचा आदर करतो, त्याला रिस्पेक्ट देतो त्याच्यात इतरही बर्याच क्वालीटीज आपोआप च येतात.."

"बर.. आणि कोणत्या व्यवसायातला पाहिजे? तुझ्यासारखं शिक्षण कि बाकी काही?"

"doesn't matter.."

"आणि एकत्र कुटुंब की ..."

"आई.. काय नाव नोंदणीचा फॉर्म भरतेयेस का!?"

"नाही.. विचारून ठेवते.. ते तुझ्या काकांच्या शेजारी राहतात न.. त्यांचा बहिणीच्या जावेचा मुलगा लग्नाचा आहे.. तर तो आहे सी.ए. म्हणजे तुझं आणि त्याचं शिक्षण वेगळं.. तर..."

"आणि हे तुला कुठून कळलं?"

"अगं.. परवा गेलेले न काकांकडे.. तेव्हा ते आलेले.. मग असाच विषय निघाला की आता तुझे शिक्षण होत आलाय.. मग मुलं बघताय का.."

"तू काय सांगितलं त्यांना?"

"मी काही नाही.. म्हटलं.. तिच्या बाबांशी बोला.. तेच काय ते सांगतील.."

"वाह! मग ठीके..."

""

"पण मग हि extra ची माहिती कुठून मिळाली म्हणे?"

"अशीच विचारून ठेवली..."

:-o "बर!"

------------------------------------------------------------------------------------------------

(तिच्या डायरी मधलं एक पान..)
कधी कधी वाटतं, म्हणताहेत एवढं तर करून टाकावं लग्न. adjustment / compromise तर आयुष्यात नेहमीच करावं लागतं. मग काय बिघडलं? पण एवढं मागे का लागायचं? एकदा हेच म्हणतात, नशिबात असेल तेच आणि तेव्हाच मिळतं. हो न? मग मिळेल न नशिबात असेल तेव्हा. आणि मुलीची बाजू, मुलीची बाजू काय? एवढं helpless का वाटतं यांना? आणि रिस्क कुठं नसते? कुठलीही गोष्ट आयुष्यात अनपेक्षितपणे घडू शकते. जोवर आपण कुणाच्या अध्ये-मध्ये नाही, कोणाचं नुकसान करत नाही, तोवर का कोणाला घाबरायचं? जर आयुष्य सुखात चालू असेल तर कशासाठी हाताचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं? हां, आता अचानकपणे कोणी आलंच आयुष्यात तर त्याबाबतीत विचार नक्की करेन मी पण जे चाललाय ते चालू द्या ना सुखाने.
कधी कधी वाटतं, एवढं केलं आई-बाबांनी आपल्यासाठी, मी त्यांची एक साधी गोष्ट ऐकू शकत नाही? पण मला वाटतं, मी पुढे शिकून, स्वतःच्या पायावर उभी राहीन आणि काहीतरी fundu करेन ना, जेव्हा आख्खं जग माझं कौतुक करेल, तेव्हा त्यांना किती अभिमान वाटेल माझा. पण त्यांना हे का कळत नाही की या सगळ्यासाठी मला त्यांची गरज आहे. त्यांच्या सपोर्ट ची. अशा वेळेस मला "सरीवर सर" मधली मधुरा वेलणकर आठवते. तिलाही हेच हवं असतं घरच्यांचा सपोर्ट. खरंच आपल्या माणसांचा सपोर्ट असेल तर कोणीही काहीही करू शकतं. जो सपोर्ट माझा नवरा मला लग्नानंतर देईलच असा हे म्हणताहेत, तोच हे का देत नाहीत? मान्य- वय, आजारपण, मृत्यू - अटळ असणारा. ते गेल्यानंतर माझं काय होईल, कसं होईल? म्हणून नवरा? नवरा खूप वर्ष जगेल याची काय guarantee? थोडक्यात "कसं होईल, काय होईल" हा प्रश्न कायमच राहणारे. ती रिस्क तर असेलच. मग त्यापेक्षा स्वत: जर मी सक्षम बनू पाहतेय तर त्याला का नाही सपोर्ट? त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की मी काय वाट्टेल ते achieve करू शकते. खरंच.