28 April, 2010

शाब्बास!

हे आवडलेले आहे! :) अतिशय!!

(I hope, ही लिंक पुढे-मागे डेड होणार नाही!)

24 April, 2010

आम्ही (होऊ घातलेले) उच्चवर्गीय अर्थात माजी(?)-मध्यमवर्गीय!

गेल्या काही दिवसांपासून मी "पैसे बचाव" अभियान सुरु केलंय. अर्थात अभियान म्हटलं असलं तरी त्याची व्याप्ती माझ्यापुरतीच आहे. म्हणजे काही गोष्टींमध्ये पैसे उगीचच खर्च करायचे (की उडवायचे?) नाहीत असा नियमच बनवून टाकलाय. उदाहरणार्थ - बऱ्याचवेळेस बाहेरचं खाल्लं जातं - त्याला काटछाट - किंवा एखादी आवडलेली वस्तू (बऱ्याचदा) गरज नसली तरी घेतली जाते तसं न करणं वगैरे. एक साधारण मध्यमवर्गीय, म्हणजे खाऊन पिऊन सुखी कुटुंब लक्षात घेतलं तरी कित्येकदा त्यामागे त्याकरिता आई-बाबांनी केलेल्या अडजस्टमेंट्स असतात. जसं जसं आपण अधिकाधिक स्वतंत्र होऊ लागतो, स्वत:च्या पायावर उभे राहतो आणि बऱ्याचवेळेस या गोष्टीने समाधानी असतो की आता आपल्या पालकांना आपल्यासाठी खर्च करावा लागत नाही; त्याच आनंदात आणि उत्साहात आपण कदाचित थोडा जास्तच खर्च करू लागतो! म्हणजे आज काल थोड्याफार फरकाने असंच दिसून येतं की, साधारण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालं की रग्गड पगाराची नोकरी - मग ती कुठेही असो - आणि मग त्यासोबत आलेलं financial freedom. २५-२६ व्या वर्षी जेव्हा आपली आधीची पिढी नोकरीने स्थैर्य आलं की संसार थाटायची तिथे आपल्या पिढीतले बहुतांश लोक घर किंवा गाडी मध्ये फक्त स्वतःच्या हिमतीवर गुंतवणूक करू लागले - अशी गुंतवणूक आपल्या आधीच्या पिढीने over the years केलेली दिसते. अगदीच एखादा नोकरी ऐवजी शिकत असला तरीदेखील ज्या तुलनेत आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांना पैशाचा स्वातंत्र्य असे, त्यामानानं आपल्या पिढीला खूपच जास्त आहे.

माझ्या स्वतःच्याच बाबतीत मी याचं विश्लेषण केलं. घरी असायचे तेव्हा रोज नेहमीचं पोळी-भाजी-भात आमटीचं जेवण - केव्हा केव्हा चटणी/कोशिंबीर/पापड.. सणासुदीला पक्वान्नं आणि कोणी पाव्हणे असले तर काही विशेष.. म्हणजे फार फार तर पुलाव / बिर्याणी अशा व्हरायटीज किंवा पोळीऐवजी एखाद वेळेस पुरी.. पाव भाजी किंवा पिझ्झा किंवा तत्सम पो.भा. प्रकारात न मोडणारे so-called one dish meal म्हणजे डोक्यावरून पाणी. पण जे काही जेव्हा केव्हा केला जायचं त्यात काय मजा असायची! म्हणजे मला आठवतंय, असाच घरी एकदा काहीतरी समारंभ होता आणि मला काकडीच्या कोशिंबिरीसाठी काकडी कोचायचं काम दिलेलं! मला काकडी कोचायाला फार आवडतं :D त्यामुळे साहजिकच मी ते अगदी मन लावून करते. तेव्हा माझी आजी प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगत होती - बघा, किती छान कोच्तेय काकडी - अगदी बारीक, कुठेही मोठ्या फोडी उरल्या नाहीएत - वगैरे वगैरे.. :D तसंच एकदा फ्रुट-सलाड करताना जी फळांची टरफलं आणि साली फेकून दिलेल्या त्यात कुठलीशी चीजवस्तू (कात्री किंवा सुरी वगैरे) देखील फेकून दिली गेलेली - म्हणजे ती वस्तू काही नंतर सापडली नव्हती :D असो! तेव्हा खरोखर असेल त्यात समाधान मानण्याची वृत्ती होती. नशिबाने अजून देखील घरातले लोक तसेच आहेत - मृगजळामागे न धावता, आहे त्यात सुखात राहणारे; पण मग कधी कधी मीच बदललेय की काय असं मला वाटू लागतं!

घरापासून दूर राहायला लागल्यावर एक गोष्ट फार अंगवळणी पडू लागते - ती म्हणजे आपण एकटे पडू लागलोय असं वाटलं की कितीही नापसंत लोकांसोबत जुळवून घ्यावं लागतं - म्हणजे एकटेपणापेक्षा ते बरं - असं! मग कधी त्या मित्रांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा आपल्यालाच सवय होऊन जाते म्हणून म्हणा - आपण खूप पैसे उडवू लागतो - म्हणजे वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पासून ते नोकरीच्या सेलिब्रेशनपर्यंत. आज काल जसं लहान मुलांच्या ग्रुप्समध्ये बर्थडे गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट अशी एक प्रथा (?) निर्माण होऊ घातलीये, तसंच काहीसं आपल्याही बाबतीत होतं. म्हणजे २ ऑप्शन्स असतात. पहिला म्हणजे आपल्या मनाविरुद्ध (बऱ्याचवेळेस)- "त्याने नाही का त्याच्या बर्थडेला मोठ्ठी पार्टी दिली? मग मला द्यायला नको का?" असं कारण देवून आपण हे आपल्या अंगवळणी पाडून घ्यायचं; आणि दुसरा ऑप्शन म्हणजे या सगळ्यापासून चार हात दूर राहायचं. मी दुसऱ्या मार्गाचा अवलंब कित्येक वर्षं केला; मध्ये काही वर्षं पहिल्या मार्गाकडेदेखील वळले पण लवकरच दुसरा मार्गचं योग्य वाटू लागला आहे पुन्हा एकदा. याचं कारण माझं मी केलेलं विश्लेषण. अगदीच ढोबळमानानं सांगायचं झालं तर फक्त मेसच्या जेवणाचा कंटाळा म्हणून मी कित्येक वेळा बाहेरच खाते. पण मग त्यातही बऱ्याच वेळेस भुकेपेक्षा जिभेचे चोचले पुरवणचं अधिक होऊन बसतं! म्हणजे असं लक्षात यायला लागलं कि मेस मध्ये नको म्हणून बाहेर एखाद्या ठिकाणी पोळी-भाजी मिळत असूनदेखील मी पिझ्झा ऑर्डर करू लागले. यात खर्चदेखील वाढला. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मला मी १.५ महिन्यात जवळ जवळ २००० रुपये फक्त खाण्या-पिण्यावर खर्च केले असं लक्षात आलं तेव्हा फार अपराधी वाटू लागलं. आणि तेव्हा लक्षात आलं कि मी कळत-नकळत पहिल्या मार्गाचा अवलंब केला होता - सवयीनं! म्हणून मग पैसे बचाव या नावाखाली पुन्हा एकदा एक balanced आयुष्य सुरु करायचं ठरवलं.

मला खात्री आहे की प्रत्येक असा माणूस जो मित्रांसोबत किंवा घरापासून दूर राहतो, तो थोड्या-फार फरकाने असाच करत असणार (जे नाहीत, त्यांचा खरच कौतुक!) म्हणजे खाण्यावर नसेल कदाचित पण पिक्चर म्हणा / कपडे म्हणा / भटकणं म्हणा.. कोणतीतरी गोष्ट नक्कीच प्रमाणाबाहेर करत असणार. कधी कोणाच्या आग्रहाखातर किंवा कधी आपोआप सवय होऊन गेली म्हणून. अर्थात पैसे कसे आणि किती खर्च करायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे; पण given that you belong to a middle class family, कुठेतरी मनात हे कायम टोचत राहतं की ज्यांनी आपल्याला या लायक बनवलं त्यांना अजूनही त्याच परिस्थितीत ठेवून आपण मजा मारतोय. यात अजून एक गोष्ट देखील असते. बर्याचदा असं होतं की आपली आधीची पिढी तेवढी flexible नसते - उदाहरणार्थ, समजा तुम्ही ठरवलं की आपण आपल्यासाठी कपडे घेण्यावर एवढे पैसे खर्च करतो, आई साठी एक मस्त भारीतली साडी घेऊ- पण साडी दिली की तिची दुसरी रियाक्शन अशी असते की - केव्हढी महाग आहे - काय साड्या कमी आहेत होय मला? (अर्थातच पहिली रियाक्शन - वाः छान आहे, आवडली - अशीच असते :)) किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना महागड्या हॉटेलात बर्थडे ट्रीट दिली म्हणून तुम्ही आई-बाबांना म्हणालात की चला आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरी काही करण्यापेक्षा आपण पिझ्झा मागवू - तर ते बऱ्याचदा नाहीच म्हणतील. त्यांची आपल्याकडून यातली कुठलीच अपेक्षा नसते. आणि मग कधी कधी त्यांच्या या rigidness ला कंटाळून म्हणा किंवा काहीही, आपण आपल्याच आयुष्यात हे सगळे करत राहतो. पण मग आपलेपणाची मजा गमावून बसतो. सगळ्यांसमोर नातीचं कौतुक करणारी आजी miss करतो; आणि छान हसत खेळत, एकमेकांना मदत करत केलेल्या स्वयंपाकाची गोडी देखील miss करतो.

उगीच नाही, पिझ्झ्याचा समाचार घेतल्यावरदेखील "चिंच-गुळाची आमटी पाहिजे.." किंवा "मला मटार उसळ खायचिए.. आत्ता लगेच" असे स्टेटस मेसेजेस chat वर टाकत आपण! किंवा, westside / fab india मधून घेतलेले expensive कपडे सोडून traditional day ला घरून आईचीच साडी घेवून येत! उगीच नाही, कोणी गणपतीसाठी घरी गेलं की मोदकांची फर्माईश करत, आणि उगीच नाही "ही पुरणपोळी.. मराठी लोकांमध्ये करतात होळीला" असं म्हणून आपल्या समस्त अमराठी मित्र-मैत्रिणींना ती आग्रहाने खायला घालत! कधी कधी मला वाटतं, आपण अजिबात बदललो नाहीये.. आपले विचार अजूनदेखील आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाभोवातीच फिरत आहेत. :) आणि असं वाटलं की अचानक एक समाधान अनुभवायला मिळत! आपण अजिबात एकटे नसल्याचं!

19 April, 2010

चलाम 'च'ची चषाभा चतये चहीना!

काही गोष्टी आपल्याला लहानपणीच शिकवल्या जातात. उदाहरणार्थ काही बडबडगीतं, काही कविता, चिऊ-काऊच्या गोष्टी - आणि हो! 'च' ची भाषा! पण मला ती कधीच बोलता आली नाही. टायटलात लिहिलंय खरं, पण तेदेखील चूक आहे कि बरोबर माहित नाही! आणि नुसतं बोलता येत नसेल तरी एक वेळ ठीक! पण मला समजायचीदेखील नाही! माझं स्पष्ट मत आहे की 'च' ची भाषा एक अत्यंत अवघड भाषा आहे. मला त्या 'च' भाषेतलं वाक्य असं "rum_time" किंवा "on_the_fly" बनवताही यायचं नाही आणि "parse" तर त्याहून करता यायचं नाही! म्हणजे कोणी काही बोललं तर मला पुन्हा एकदा ते मनातल्या मनात बोलून बघावं लागायचं. कधी कधी ते डोळ्यासमोर हवेतल्या हवेत लिहून बघावं लागायचं. तरीदेखील मला नेहमी कळायचंच असं नाही! आणि त्यामुळे माझा या 'च' नामक भाषेवर फार राग आहे!

तसंच या 'च'च्या भाषेने मोठेपणीदेखील कित्येकदा मला त्रास दिलेला आहे. जसं की, माझी भाची (ती लहान असताना) काही गोष्टींसाठी फार हट्ट आणि रडारड करायची (सगळेच करतात म्हणा!) म्हणून तिला कळू नये अशा हेतूने घरातलं कोणीतरी मला काहीतरी "कोड लेंग्वेज" मध्ये सांगायचं आणि त्यांना ही 'च'चीच भाषा फार आवडायची! नंतर नंतर तर माझ्या भाचीलासुद्धा कळायचं की हे मोठे लोक काय लपवताहेत पण मला अजिबात नाही.. :( मला तर वाटतं की, तिच्यासारखंच माझ्या लहानपणीदेखील हे सगळे 'च'च्या भाषेत बोलत असणार मला कळू नये म्हणून, आणि त्यामुळे मी ती भाषा अजूनदेखील कधीच शिकले नाही! :D

चणूनम्ह चलाम 'च'ची चषाभा चजिबातअ चवडतआ चहीना. चश्शहु..! आपलं ते.. हुश्श! :D

15 April, 2010

प्रार्थना

आज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर "कराग्रे वसते लक्ष्मी" म्हणण्याकरता हात जोडले; आणि एकदम वाटलं की या हातात आणि नमाज पडत असलेल्या माणसाच्या हातात फरक काय? यापैकी कोणता माणूस "अल्लाह हो अकबर..." म्हणतोय आणि कोणता "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती.." म्हणतोय? नाही ना सांगता येत?
(चित्रं येथूनयेथून घेतली आहेत.)

05 April, 2010

गांगुलीमय मी!


"गांगुली" या शब्दाने माझ्या आयुष्याची काही वर्षं व्यापलेली आहेत. म्हणजे, अचूक सांगायचं तर (मी) आठवीत असल्यापासून ते गांगुलीने क्रिकेट ला राम राम ठोकला तोपर्यंतची सगळी! खरं तर क्रिकेट ची मेच आणि "आमची माती आमची माणसं" एकाच आवडीने पाहणारी मी! एकदा केव्हातरी गांगुलीला पाहिलं आणि माझी विकेटच उडाली. नेमकं कोणती मेच होती ते काही आठवत नाही.. हे महाशय पेटले होते आणि अगदीच काही शंभरी वगैरे नाही पण धावफलक बर्यापैकी हलता ठेवला होता. त्या मेच मध्ये हारलो कि जिंकलो हे सुद्धा मला आठवत नाही. पण एक नक्की कि त्यानंतर मी जी काही क्रिकेटवेडी.. आह! नाही.. गांगुलीमय झालेय.. ते अगदी आजतागायत आहे.

मला गांगुलीबद्दल सगळ्यात जास्त काय आवडतं? हे सांगणं महाकठीण काम आहे. अगदी त्याच्या ठोकलेल्या सिक्सर पासून ते टेन्शनमध्ये असतानाचं त्याचं नखं कुरतडणं. किंवा मैदानावर प्रचंड माज दाखवण्यापासून ते "well played boys" म्हणत सगळ्यांची पाठ थोपटणं. सगळंच! स्वयंपाकघरात पाउल न टाकणारी मी, गांगुली ने शंभरी गाठली की शिरा करायचे! आणि तो आउट होऊ नये यासाठी त्याच्याही पेक्षा जास्त अंधश्रद्धाळू बनायचे.. म्हणजे.. एकदा आम्ही केरम खेळत असताना दर वेळेस माझी सोंगटी गेली की तो चौकार / षटकार मारत होता. काय प्रचंड एकाग्रतेने खेळलेले मी त्या दिवशी केरम! फक्त त्याची शंभरी व्हावी म्हणून. दहावीच्या परीक्षेची तर वेगळीच मजा! संस्कृत चा आवडता पेपर होता. २ दिवस सुट्टी होती आणि त्यातल्या दुसर्या दिवशी मेच. २ दिवस सुट्टी आहे - असं म्हणून पहिल्या दिवशी काहीच केलं नाही आणि रात्री आठवलं की मेच आहे उद्या! झालं.. निम्मा अभ्यास रात्री बसून केला. दुसर्यादिवशी प्रवचनाला बसल्याप्रमाणे टी.व्ही. समोर! नेहमीच्या जागेवर! का? कारण, मी तिथे बसले की तो चांगला खेळतो (आवरा! पण खरच केलंय मी असं :)) एवढंच काय! कधी कधी (खरतर बर्याच वेळेस) तो छानपैकी झेल देवून बाद व्हायचा.. आणि मग असं ओळीने २-३ मेच मध्ये झालं की डोळ्याच्या कडा ओलावायच्या खरं :( एकदा तर मेच संपल्यावर मी रात्री बराच वेळ रडत देखील होते. नाही - लहान वगैरे नव्हते मी तेव्हा! पण काय करणार! व्हायचं खरं असं :-|

गांगुली आणि माझं एक निराळाच नातं आहे! त्याला काय म्हणावं काय माहित? काही अविश्वसनीय अशा गोष्टी घडल्यात खर्या. त्यातली एक महत्वाची म्हणजे, २६ मे १९९९ ची. २४ मे ला वाढदिवसानिमित्त मैत्रिणी घरी आलेल्या, आणि मग २६ तारखेला कुठेतरी ट्रीपला जाण्याचा विषय निघाला. सगळे उत्साहाने तयार झाले कारण दहावीची सुटी चालू होती! जवळ जवळ ठरलं सगळं आणि मी रात्री मैत्रिणीला फोन करून येणार नाही असं सांगितलं. कारण? अर्थातच २६ ला मेच होती. आपण-श्रीलंका. विश्वचषकामधली. का कुणास ठावूक, ती मेच बुडवू नये असं मला अचानक वाटून गेलं. त्यामुळे मैत्रीणींना प्रचंड माज दाखवत मी गेलेच नाही फिरायला. आणि काय सुरेख गेली ती संध्याकाळ! १८३ धावा! एकदिवसीय मेच मधल्या सर्वोत्तम त्या दिवशी गांगुली ने केल्या. शिराच काय पंचपक्वान्नांच जेवण ही बनवायला मी तयार होते त्या दिवशी :D

कुठलीशी मेच होती अशीच.. कांगारुंसोबत. शारजाहला असावी बहुतेक (आठवत नाही) कारण ती आपल्याकडे मध्यरात्री २.३० ला सुरु होणार होती. झोपताना बाबांना सांगून ठेवलेले कि मला २.३० ला उठवा, जे त्यांनी केलं नाही. :( आणि तेव्हा मला स्वप्न पडलं की कुठलीशी मेच सुरु आहे आणि त्यात गांगुली ने २ विकेट्स घेतल्यात! त्या आनंदातच मला जाग आली आणि चमकलं की - आरे! मेच! साधारण ३.३०-४ वाजले असावेत. ताडकन उठले आणि टी.व्ही. लावला. कांगारू होते २१-२ वर आणि त्यातली १ विकेट गांगुली ने घेतलेली! अजून देखील यावर विश्वास बसत नाही की खरच असं घडलं होतं!


काही आवडू लागलं की त्याच एका गोष्टीबद्दल वाचलं जातं.. तेव्हढाच विचार केला जातो.. माझंही तसंच झालं! गांगुली बद्दल मिळेल ती आणि मिळेल तिथून माहिती मिळवायचे मी. त्याच्या त्याच त्याच इंनिन्ग्स, तेच तेच इंटरव्हू, त्याच त्याच बातम्या - अक्षरश: पारायण करायचे. दहावीच्या सुट्टीत त्याचं स्केच काढायचं ठरवलं. त्या आधीचे स्केचिंग चे सगळे प्रयत्न अयशस्वी होवून देखील! म्हणजे आधी काढलेल्या ८-१० स्केचेस पैकी काजोल आणि वाजपेयी सोडून कोणीच त्या खाली लिहिलेल्या नावाप्रमाण दिसत नसायचं. पण हे चित्र फार म्हणजे फारच हिट झालं. माझ्यामते ते काही अति उच्च वगैरे नाही आहे पण लोकांना खूपच आवडलं (किंवा ते तसं म्हणाले तरी!) असो! तर असं हे माझं गांगुली-प्रेम उतू जात होतं. शाळेत असल्यापासून मी त्याची बरीचशी चित्र (पेपर / मासिकात येणारी), तसंच त्याच्यावर येणारे लेख, असं बरंच काय काय गोळा करून ठेवलेलं.. त्याची एक छानशी वही पण बनवलेली. पण नंतर नंतर आधी कौतुकास्पद वाटणारी हि गोष्ट घरच्यांना वेडेपणा वाटू लागली आणि मग एक दिवस मी स्वतःच चिडून जाऊन ती वही फाडून टाकली.. एव्हढंच नव्हे तर माझ्या अभ्यासाच्या टेबलाला लावलेलं त्याचं पोस्टर (ज्यावरून हे स्केच काढलं) ते हि फाडून टाकलं :-| (पुन्हा एकदा - असो!)

हे गांगुली-प्रेम इतकं होतं की मेच असली की माझी आजी देखील अगदी आठवणीनं विचारायची - काय ग, तुझ्या गांगुली ने किती रन्स केल्या? :) त्याने तिकडे क्रिकेटला राम राम ठोकला आणि मी ही मेच बघण्याला. पण परवा एकदा कुठलीशी मेच टी. व्ही. वर चालू होती, तेव्हा अचानक गांगुली चा आवाज कानावर पडला आणि मी बसल्या जागी उभी राहून नाचायलाच लागले. तेव्हा आजी म्हणाली देखील - आहे का अजून पण तो वेडेपणा! मिनिटभरापूर्वी मी त्या टी. व्ही कडे ढून्कुनदेखील पाहत नव्हते आणि आत्ता त्याच्यासमोर जाऊन उभी राहिलेले! काय करणार, इतक्या वर्षांनी त्याचं असं दर्शन झालं ना! :)

माझ्या गांगुली-प्रेमाचा लोकांना काय अपार कौतुक! का? सोप्पं आहे - त्याचा वाढदिवसाला म्हणजे ८ जुलै ला मी सगळ्यांना चोकोलेट्स वाटते ना! मग का नाही करणार ते कौतुक :D २ वर्षांपूर्वी तर "HBD" (अर्थात Happy Birthday, Dada!) या स्टेटस मागचं रहस्य ओळखल्याबद्दल हर्षदाने माझ्याकडून BJC मध्ये ट्रीट देखील उकळली आहे! दिली आपली मी! :P प्रेम आंधळं असतं म्हणतात ते हेच! :D