10 June, 2011

18 May, 2011

मशीद

मला रस्त्यावरुन चालत / गाडी चालवत जाताना आजुबाजुला दिसणार्या देवळांकडे पाहुन नमस्कार करायची सवय आहे. हो, सवयच म्हणावं लागेल! म्हणजे कित्येकदा तर ते मंदीर नक्की कुठल्या देवाचं आहे हे ही माहित नसतं पण सवयीनं हात कपाळाकडे जातो किंवा मान झुकतेच. रोज ऑफिसला जाता येता मला किमान १५ देवळं तरी दिसतात. आणि हो.. एक मशीद सुद्धा दिसते. खरतर मशीदीमधली प्रार्थना (हो, नमाजच. पण इथं आधी लिहिल्याप्रमाणे खरच दोन्ही सारखंच तर आहे!) खूप वेळा कानावर पडते. कित्येकदा आत जावसंसुद्धा वाटतं पण नाहीच गेले कधी! असो!

तर  ही रोज दिसणारी मशीद. अगदी सिग्नलच्या चौकात आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेला तर हमखास मी सिग्नलला थांबलेली असताना सगळं लक्ष मशीदीकडेच जातं. बुरखाधारी बायका त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेवून लगबगीनं आत जात असतात. एखादा भिकारी मशीदिच्या दारात लोकांकडे आशेने बघत बसलेला असतो. बाईकवरुन आलेला एखादा तरूण आत जाताना मात्र डोक्यावर पांढरी टोपी घालत असतो. कुठल्याही देवळाबाहेर असेल असंच दॄश्य!

एक दिवस सिग्नलला थांबलेली असताना अचानकच मी नमस्कार केला. मशीदीकडे पाहुन. मग ती हि सवय लागली. काल त्या सिग्नलला आल्यावर ब्रेक लावणार गाडीला इतक्यात समोरच्या गाडीवर मागे बसलेल्या एक खेडवळ बाईकडे लक्ष गेलं. ती - साधंसं सुती लुगडं, कपळावर लाल कूंकू, सावळा रंग - ती हात जोडत होती - मशीदीकडे पाहुन. का कुणास ठावुक, पण फारच भारी वाटलं!

27 January, 2011

नापास (न झालेल्या) मुलीची गोष्ट

"नापास होणं" यात चर्चा करण्यासारखं काय असतं - ते मला अजुन समजलेलं नाही! एखाद्या दिवशी आईनं केलेल्या पोळ्या चिवट झाल्या किंवा एखाद्या कोकणातल्या मुलीनं "मकई की रोटि, सरसोंका साग" वगैरे पहिल्यांदाच बनवलं आणि ते पुर्णपणे फसलं - तर आई आणि ती मुलगी नापास की काय?! नाहीच! कारण पोळ्या चिवट व्हायला नीट न दळलेल्या कणकेपासुन ते बर्नरची आच नीट न असणं अशा कित्येक गोष्टी कारणीभूत असू शकतात. तसचं त्या बिचार्या कोकणकन्येला आमसुलाच्या साराची सवय, तीला कसं लगेच "मकई की रोटि, सरसोंका साग" जमणार? तसंच आहे! १०० पैकी मार्क द्यायचे ठरवले तर त्या चिवट पोळ्यांनाही कदाचित ३५ मिळायचे नाहीत! after all, in the world of relative grading...! :)

आमच्या घरात मात्र "पास"/"नापास" ह्यावर इतर बर्याचशा घरांप्रमाणेच चविष्ट चर्चा मी नेहमीच बघत आले आहे. मग ती मी शाळेत असतानाची असो किंवा माझी भाची आत्ता शाळेत असतानाची असो! विषय आणि मुद्दे तेच! पास/नापास एकवेळ समजु शकतो माणुस कारण असे टप्पे माणसाच्या आयुष्यातली प्रगती (नक्की कसली?) दर्शवितात (म्हणे!). पण, साडे नव्याण्णव मार्क का मिळाले (अहो, म्हणजे १०० का नाहीत)? - अशा गोष्टी म्हणजे जरा जास्तच नाही का? या आणि अशा कित्येक प्रश्नांच्या सरबत्तीला मी तोंड दिलेलं आहे आणि माझी भाचीसुद्धा तोंड द्यायला हळुहळु शिकत आहे! असो!

माझ्या सुदैवाने(च म्हणावं लागेल), मला "पास/नापास" ला कधी तोंड द्यावं लागलं नाही. माझं शिकत असताना एक तत्व .. आरे बापरे.. नाही म्हणजे साधाच नियम म्हणा.. होता. तो म्हणजे - "परिक्षेचा फडशा पाडायचा". मला अभ्यास करायला, पेपर लिहायला, उत्तरं अधोरेखित करायला वगैरे वगैरे इतकं प्रचंड आवडायचं की ठरवूनदेखील मी शाळा-कॉलेज च्या परिक्षामध्ये कधी नापास झाले नसतेच बहुतेक! त्यामुळे एका प्रकारच्या प्रश्नांच्या सरबत्तीमधुन माझी सुटका झाली! पण त्यामुळे असं व्हायचं की - "एव्हढा चांगला अभ्यास करतेस, आणि काय ग आयत्या वेळेस अशा चुका करतेस - थोडं अजुन वाचलं असतंस, पाठ केलं असतंस, तर पैकीच्या पैकी मिळाले असते" अशा कॉमेंट्सना मात्र सामोरं जावं लागायचं. कोणी विशेषतः गणिताच्या बाबतीत मला असं म्हणालं की - "गणित बरोबर आहे पण मधल्या २ स्टेप्स खाल्यास! नाहीतर पैकीच्या पैकी मिळाले असते" - की मला एव्हढा प्रचंड राग यायचा! मला वाटायचं - त्या स्टेप्स काय लिहयच्या! - किती सोप्प्या आहेत त्या! शिक्षकांना तर कळेलही तेवढं!! अशा न आवडण्यार्या गोष्टी न केल्यामुळे जे काही मार्क्स जायचे तेवढ्याची बोलणी मात्र यायची वाट्याला!

पण "नापास" या शब्दाने खरंतर माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. पण तो खोटा-खोटा! म्हणजे - चौथीत असताना, शिष्यवृत्तीच्या सराव परिक्षेत, मी एकदा मजाच केली होती! म्हणजे बाईंनी सांगितलं पेपर-अ सोडवा आणि मी (झोपेत!) सोडवला पेपर-ब! झालं! MCQ असल्यामुळे पेपर चेक करताना फक्त पर्याय तपासले गेले आणि मी १०० पैकी २० मार्क्स मिळवुन चक्क नापास झाले! एकदम "नापास" असा मानसिक धक्का बसल्यामुळे (किंवा लोकांनी दिल्यामुळे) मी भोकाड पसरलं आणि नंतर माझ्या बाईंनाच शंका आली आणि सगळा उलगडा झाला!

असं एकमेव खोटं "नापास" सोडलं तर लोकांच्या दृष्टीनं महत्वाच्या अशा कुठल्या परिक्षेत नापास झाले नाही मी. मला नेहमी वाटायचं, कसं वाटत असेल नापास झालं तर? खरंच का ती आयुष्य संपवण्याइतकी लाजिरवाणी गोष्ट आहे? हळुहळु मला जाणवलं की लोकांकडुन नेहमीच "नापास" ही जाणीव करुन दिली जाणारच! आपण १०० % दिले असतील तर कुठलीच गोष्ट मनावर घ्यायची गरज नसते!

मजा म्हणजे - या कधीच नापास न झालेल्या मुलीबद्दल सगळ्यांना भारीच विश्वास निर्माण झाला होता आणि दुर्दैवानं तो "अभ्यास / शिक्षण" या पलिकडे गेला होता! म्हणजे ही "नापास" न झालेली मुलगी सगळीकडेच पास च होत राहणार असा दुर्दम्य (उगिच!) विश्वास! आणि त्यातच ती नापास झाली! कशात माहितिए? - चारचाकी गाडी चालवण्याच्या परिक्षेत! आणि तिथच तिला कळलं - की - ती आजवर कधी नापास झाली नाही कारण आजवर तिनं तिच्या मनासारखं केलं - मनाविरुद्ध केलेली / शिकलेली ही एकच गोष्ट - चारचाकी चालवायला शिकणं! अजुनही कोणी मला म्हटलं की घे आता चारचाकी आणि त्यातुन जा ऑफिसला - की मला ऐकुनच कंटाळा येतो.

theoretically मात्र आई.आई.टी. मध्ये कित्येक वेळा आम्ही "नापास" झालेलो आहोत! मग ते CS601 मधले 17/70 असोत किंवा अतिप्रसिद्ध CS636 मधले 5.5/35 असोत! ते मार्क्स घरी सांगायची वेळ आली नाही म्हणुन ठीक, नाहितर बोलणी अटळ होती! पण त्या 5.5 किंवा 17 मध्ये प्रचंड मजा होती! कधी कधी तर 5.5 हेच सर्वोत्तम मार्क्स असायचे! तेव्हा तर आनंद गगनात मावत नसे! :D अशा वेळी तर "नापास" हे गावीही नसायचं कोणाच्या!

पण जवळ्जवळ १२-१४ वर्षांनीदेखील माझ्या भाचीला त्या आणि तशाच प्रकारच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय म्हणजे खरंच कठीण आहे! "परिक्षा" आणि 'मार्क्स" या जगात हरवलेल्या लोकांमध्ये राहणारया एखाद्याला, ज्याचं/जिचं माझ्यासारखं परिक्षेवर प्रेम नाही आहे - अशांसाठी हे किती त्रासदायक ठरेल!