05 April, 2010

गांगुलीमय मी!


"गांगुली" या शब्दाने माझ्या आयुष्याची काही वर्षं व्यापलेली आहेत. म्हणजे, अचूक सांगायचं तर (मी) आठवीत असल्यापासून ते गांगुलीने क्रिकेट ला राम राम ठोकला तोपर्यंतची सगळी! खरं तर क्रिकेट ची मेच आणि "आमची माती आमची माणसं" एकाच आवडीने पाहणारी मी! एकदा केव्हातरी गांगुलीला पाहिलं आणि माझी विकेटच उडाली. नेमकं कोणती मेच होती ते काही आठवत नाही.. हे महाशय पेटले होते आणि अगदीच काही शंभरी वगैरे नाही पण धावफलक बर्यापैकी हलता ठेवला होता. त्या मेच मध्ये हारलो कि जिंकलो हे सुद्धा मला आठवत नाही. पण एक नक्की कि त्यानंतर मी जी काही क्रिकेटवेडी.. आह! नाही.. गांगुलीमय झालेय.. ते अगदी आजतागायत आहे.

मला गांगुलीबद्दल सगळ्यात जास्त काय आवडतं? हे सांगणं महाकठीण काम आहे. अगदी त्याच्या ठोकलेल्या सिक्सर पासून ते टेन्शनमध्ये असतानाचं त्याचं नखं कुरतडणं. किंवा मैदानावर प्रचंड माज दाखवण्यापासून ते "well played boys" म्हणत सगळ्यांची पाठ थोपटणं. सगळंच! स्वयंपाकघरात पाउल न टाकणारी मी, गांगुली ने शंभरी गाठली की शिरा करायचे! आणि तो आउट होऊ नये यासाठी त्याच्याही पेक्षा जास्त अंधश्रद्धाळू बनायचे.. म्हणजे.. एकदा आम्ही केरम खेळत असताना दर वेळेस माझी सोंगटी गेली की तो चौकार / षटकार मारत होता. काय प्रचंड एकाग्रतेने खेळलेले मी त्या दिवशी केरम! फक्त त्याची शंभरी व्हावी म्हणून. दहावीच्या परीक्षेची तर वेगळीच मजा! संस्कृत चा आवडता पेपर होता. २ दिवस सुट्टी होती आणि त्यातल्या दुसर्या दिवशी मेच. २ दिवस सुट्टी आहे - असं म्हणून पहिल्या दिवशी काहीच केलं नाही आणि रात्री आठवलं की मेच आहे उद्या! झालं.. निम्मा अभ्यास रात्री बसून केला. दुसर्यादिवशी प्रवचनाला बसल्याप्रमाणे टी.व्ही. समोर! नेहमीच्या जागेवर! का? कारण, मी तिथे बसले की तो चांगला खेळतो (आवरा! पण खरच केलंय मी असं :)) एवढंच काय! कधी कधी (खरतर बर्याच वेळेस) तो छानपैकी झेल देवून बाद व्हायचा.. आणि मग असं ओळीने २-३ मेच मध्ये झालं की डोळ्याच्या कडा ओलावायच्या खरं :( एकदा तर मेच संपल्यावर मी रात्री बराच वेळ रडत देखील होते. नाही - लहान वगैरे नव्हते मी तेव्हा! पण काय करणार! व्हायचं खरं असं :-|

गांगुली आणि माझं एक निराळाच नातं आहे! त्याला काय म्हणावं काय माहित? काही अविश्वसनीय अशा गोष्टी घडल्यात खर्या. त्यातली एक महत्वाची म्हणजे, २६ मे १९९९ ची. २४ मे ला वाढदिवसानिमित्त मैत्रिणी घरी आलेल्या, आणि मग २६ तारखेला कुठेतरी ट्रीपला जाण्याचा विषय निघाला. सगळे उत्साहाने तयार झाले कारण दहावीची सुटी चालू होती! जवळ जवळ ठरलं सगळं आणि मी रात्री मैत्रिणीला फोन करून येणार नाही असं सांगितलं. कारण? अर्थातच २६ ला मेच होती. आपण-श्रीलंका. विश्वचषकामधली. का कुणास ठावूक, ती मेच बुडवू नये असं मला अचानक वाटून गेलं. त्यामुळे मैत्रीणींना प्रचंड माज दाखवत मी गेलेच नाही फिरायला. आणि काय सुरेख गेली ती संध्याकाळ! १८३ धावा! एकदिवसीय मेच मधल्या सर्वोत्तम त्या दिवशी गांगुली ने केल्या. शिराच काय पंचपक्वान्नांच जेवण ही बनवायला मी तयार होते त्या दिवशी :D

कुठलीशी मेच होती अशीच.. कांगारुंसोबत. शारजाहला असावी बहुतेक (आठवत नाही) कारण ती आपल्याकडे मध्यरात्री २.३० ला सुरु होणार होती. झोपताना बाबांना सांगून ठेवलेले कि मला २.३० ला उठवा, जे त्यांनी केलं नाही. :( आणि तेव्हा मला स्वप्न पडलं की कुठलीशी मेच सुरु आहे आणि त्यात गांगुली ने २ विकेट्स घेतल्यात! त्या आनंदातच मला जाग आली आणि चमकलं की - आरे! मेच! साधारण ३.३०-४ वाजले असावेत. ताडकन उठले आणि टी.व्ही. लावला. कांगारू होते २१-२ वर आणि त्यातली १ विकेट गांगुली ने घेतलेली! अजून देखील यावर विश्वास बसत नाही की खरच असं घडलं होतं!


काही आवडू लागलं की त्याच एका गोष्टीबद्दल वाचलं जातं.. तेव्हढाच विचार केला जातो.. माझंही तसंच झालं! गांगुली बद्दल मिळेल ती आणि मिळेल तिथून माहिती मिळवायचे मी. त्याच्या त्याच त्याच इंनिन्ग्स, तेच तेच इंटरव्हू, त्याच त्याच बातम्या - अक्षरश: पारायण करायचे. दहावीच्या सुट्टीत त्याचं स्केच काढायचं ठरवलं. त्या आधीचे स्केचिंग चे सगळे प्रयत्न अयशस्वी होवून देखील! म्हणजे आधी काढलेल्या ८-१० स्केचेस पैकी काजोल आणि वाजपेयी सोडून कोणीच त्या खाली लिहिलेल्या नावाप्रमाण दिसत नसायचं. पण हे चित्र फार म्हणजे फारच हिट झालं. माझ्यामते ते काही अति उच्च वगैरे नाही आहे पण लोकांना खूपच आवडलं (किंवा ते तसं म्हणाले तरी!) असो! तर असं हे माझं गांगुली-प्रेम उतू जात होतं. शाळेत असल्यापासून मी त्याची बरीचशी चित्र (पेपर / मासिकात येणारी), तसंच त्याच्यावर येणारे लेख, असं बरंच काय काय गोळा करून ठेवलेलं.. त्याची एक छानशी वही पण बनवलेली. पण नंतर नंतर आधी कौतुकास्पद वाटणारी हि गोष्ट घरच्यांना वेडेपणा वाटू लागली आणि मग एक दिवस मी स्वतःच चिडून जाऊन ती वही फाडून टाकली.. एव्हढंच नव्हे तर माझ्या अभ्यासाच्या टेबलाला लावलेलं त्याचं पोस्टर (ज्यावरून हे स्केच काढलं) ते हि फाडून टाकलं :-| (पुन्हा एकदा - असो!)

हे गांगुली-प्रेम इतकं होतं की मेच असली की माझी आजी देखील अगदी आठवणीनं विचारायची - काय ग, तुझ्या गांगुली ने किती रन्स केल्या? :) त्याने तिकडे क्रिकेटला राम राम ठोकला आणि मी ही मेच बघण्याला. पण परवा एकदा कुठलीशी मेच टी. व्ही. वर चालू होती, तेव्हा अचानक गांगुली चा आवाज कानावर पडला आणि मी बसल्या जागी उभी राहून नाचायलाच लागले. तेव्हा आजी म्हणाली देखील - आहे का अजून पण तो वेडेपणा! मिनिटभरापूर्वी मी त्या टी. व्ही कडे ढून्कुनदेखील पाहत नव्हते आणि आत्ता त्याच्यासमोर जाऊन उभी राहिलेले! काय करणार, इतक्या वर्षांनी त्याचं असं दर्शन झालं ना! :)

माझ्या गांगुली-प्रेमाचा लोकांना काय अपार कौतुक! का? सोप्पं आहे - त्याचा वाढदिवसाला म्हणजे ८ जुलै ला मी सगळ्यांना चोकोलेट्स वाटते ना! मग का नाही करणार ते कौतुक :D २ वर्षांपूर्वी तर "HBD" (अर्थात Happy Birthday, Dada!) या स्टेटस मागचं रहस्य ओळखल्याबद्दल हर्षदाने माझ्याकडून BJC मध्ये ट्रीट देखील उकळली आहे! दिली आपली मी! :P प्रेम आंधळं असतं म्हणतात ते हेच! :D

10 comments:

sharayu said...

दुसर्याला खड्ड्यात घालणे याप्रकाराबाबत आपले मत काय?

Girija said...

prashnacha aawaka faar motha aahe, kiwwa mala prashn kalalela nahee. mat kai denar tyamule kalat nahee. mee kadhi konala khadyaat ghatalele nahi ani ghalanar nahee. evadhech sangu shakate sady paristhiteet

Alhad Mahabal said...

छान!
:)
मजा वाटली वाचून!!



alhadmahabal.wordpress.com
आम्हा वर्डप्रेसवाल्यांनाही कमेंट्स अलाऊ करा की!

Vinay Deshpande said...

Awesome.. You have just put into words what I exactly feel (of course except for the Shira stuff!) I still remember that 1999 WC match.. I had to go to some class in the evening at 6.45. I usually used to leave at 6.10, but because of the match, I left home at 6.40. Cycle prachand jorat hanayacha prayatna karat hoto, ani tevdhyatach taan asahya houn cycle chi chain tutali ani me dhad dishi jaminivar adava! Khup lagale, but that was worth it! :)

Vinay Deshpande said...

Awesome.. You have just put into words what I exactly feel (of course except for the Shira stuff!) I still remember that 1999 WC match.. I had to go to some class in the evening at 6.45. I usually used to leave at 6.10, but because of the match, I left home at 6.40. Cycle prachand jorat hanayacha prayatna karat hoto, ani tevdhyatach taan asahya houn cycle chi chain tutali ani me dhad dishi jaminivar adava! Khup lagale, but that was worth it! :)

Aruna said...

hey BRILLIANT post ! :)
I have written something similar for Zaheer here http://pindropnonsense.blogspot.com/2010/01/bout-epitome-of-determination.html

n I love Sourav as well :)

Girija said...

thanks Alhad, Vinay, Aruna and Sharayu(?) :)

Yawning Dog said...

Waw, u're one of those dada fanatics :)
Tuzyaevdha nahee pan malapan ganguly jaam avdaycha.
Mastch ahe post

Unknown said...

farch mast lihilayas... mala mahit navat tuz ganguly prem evadh prachand ahe..
aadhi mahit asat tar gaganuly chi century zalyawar nakki ale aste tuzya ghari, (shira khayla ganguly aavadnyachi kahi garaj nahiye na.. ;))

Girija said...

@रुपाली, नाही ग, शिरा सगळ्यांसाठी :)