20 July, 2009

विडंबन - १

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा ||ध्रु||

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा ||१||

या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा ||३||
(येथून उचललं आहे - पहिलं आणि तिसरं कडवं)

"हा खेळ सावल्यांचा" या चित्रपटातलं हे गीत... मी जेव्हा पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला / गाणं ऐकलं, तेव्हा माझ्या बाबांनी मला त्याचं विडंबन कसं करता येइल याची एक मस्त आयडिया ची कल्पना दिली होती - ते नेहमी शेवटची ओळ म्हणताना - "हा खेळ चावण्याचा..." असं म्हणायचे...

आज खूप वर्षांनी मला याचं थोडंफार विडंबन सुचल्यासारखं वाटतंय... ते असं...

पावसाळ्यात खेळ चाले, या डास-प्राणियांचा
संपेल ना कधीही, हा त्रास चावण्याचा ||ध्रु||

हा डास ना गरीब, मलेरिया वाहतो हा
पावसात माणसांच्या, शिव्या शाप भोगतो हा
आजारास होई कारण, हा डास एव्हढास्सा ||१||

या मस्त पावसाळी, का त्रस्त चेहरा हा
odomos लावुनिया, जा झोप शांत आता
येइल निवांत झोप, आता मच्छरदाणीत||३||
आशा आहे की हे इतकंही वाईट नसावं की तुम्ही मला चावायला उठाल... :P

18 July, 2009

नए नए से दर्द की तलाश में...

माझं खूप वेळा असं झालंय... की एखादा वाईट अनुभव येतो, मी प्रचंड दु:खी होते... चिडचिड करते... आणि काही दिवसांनी माझ्या लक्षात येतं की मी पुन्हा त्याच मार्गावर चालले आहे... पुन्हा तसाच अनुभव येणार आहे... आणि कधी कधी तर असं वाटतं की मी त्या अनुभवाची वाटच बघत होते... माझा एक मित्र मला म्हणायचा- "स्वत:चं दु:ख कुरवाळत बसू नकोस..." पण बहुतेक मला तेच करायला आवडायचं... आता हळुहळु त्याचं म्हणणं पटायला लागलंय...

कित्येक लोकांबाबत मी पाहिलंय की त्यांना ते करत आहेत त्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे हे व्यवस्थित माहीत असतं... कारण तो अनुभव त्यांनी घेतलेला असतो एकदा... पण तरीही ते तोच मुर्खपणा करायला जातात खरं !! (हे मी सुद्धा केलेलं आहे...) की त्यांना तरीही त्यातून वेगळं काही मिळेल अशी आशा असते ?? (मला तरी होती, :D) कोणास ठाउक...! "उम्मीद पे दुनिया टिकी है" - म्हणतात, तसंच काहीतरी असावं...

नेमकं हेच स्वानंद किरकिरेंनी "खोया खोया चांद"च्या शीर्षक गीतात फार सुरेख मांडलं आहे...

ये खुश नही जो मिला,बस मांगता ही है चला...
जानता है, हर लगी का दर्द ही है इक सिला...
क्यूँ नए नए से दर्द की फिराक में, तलाश में उदास है दिल...
क्यूँ अपने आप से खफा खफा, जरा जरासा नाराज है दिल...

16 July, 2009

प्रेझेण्टेबल

सकाळीच हा लेख वाचला...
http://beta.esakal.com/2009/07/15150534/entertainment-aditi-sarangdhar.html

त्यात शेवटी असं लिहिलेलं आहे...
बेसिक मेकअप कसा करावा याची प्रत्येक मुलीला माहिती असणं आज काळाची गरज बनली आहे. प्रेझेण्टेबल दिसणं खूप आवश्‍यक असतं.
आणि मग हा लेख वाचला...
http://beta.esakal.com/2009/07/16165027/features-on-self-help-group.html

फोटो मधल्या त्या साध्या, सावळ्या, "मेकअप" ची माहिती नसलेल्या पण चेहर्यावर समाधान आणि हसू असणार्या बायका!!

08 July, 2009

चिऊ!

आज सकाळचीच गोष्ट.. मेस मध्ये न्याहारीला गेले. उपमा पाहून तोंड वाकडं केलं. डिश भरून घेवून आले. खिड़कीजवळच्या टेबल वर जाऊन बसले. अचानक चिवचिव ऐकू आली. समोर पाहिलं तर खिडकीत चक्क चिमण्या!! तशी मेस मध्ये बऱ्याच वेळेस एखादी चिमणी दिसते पण आज चक्क ४ चिमण्या!! त्यातली एक खिडकीच्या दारावर येवून बसली, तिचा उपमा आवडीचा असावा, कारण खिडकीत उपम्याचं एक ढेकूळ सांडलं होतं, (आता ते तिथे कसं सांडलं, ते माहीत नाही किंवा कोणीतरी मुद्दाम तिथे ठेवलं असेल, चिमण्यांसाठी :) ) तर ती तिथे खाली आली आणि मस्त उपमा खाऊ लागली, १०-१५ सेकंदं खायची, चोचीने हळूच एवढासा रव्याचा दाणा खात असेल! आणि मग वर बघून चिवचिव करायची! काही वेळाने तिकडे दुसरी चिऊ आली, आणि काय मजा! ही पहिली चिमणी चक्क थोडीशी बाजुला झाली! मग त्या दुसऱ्या चिऊला मस्त ऐसपैस जागा मिळाली उपमा खात बसायला!
असं १ मिनिटभर चालु होतं, थोड़ा उपमा खायचा आणि जरा वेळ वर बघून चिवचिव करायची! मग त्यातली पहिली चिमणी उडून वर खिडकीच्या दारावर गेली, तिकडे अजुन २ चिमण्या बसल्या होत्या, ती तिकडे जाउन पण चिवचिव करून आली, आणि काय मज्जा! २ क्षणातच त्या २ चिमण्या खाली आल्या आणि उपमा खाऊ लागल्या! आणि आधीच्या चिमणी लगेच बाजुला सरकली! मग थोड्या वेळाने ती उडून गेली!
मग मला त्या चिवचिवाचा अर्थ कळला, आधी वर पाहून चिवचिव करणारी चिमणी कदाचित तिच्या मैत्रिणिंना बोलावत असेल उपमा खायला... त्या बधिर आहेत, त्यांना कळत नहिए, असं लक्षात आल्यावर मग ती स्वत:च उडून वर जाउन बसली, तिकडे पण चिवचिव करून त्यांना - जा खाली उपमा आहे असा सांगितलं असणार नक्कीच! त्याशिवाय का त्या दोघी लगेच खाली आल्या! आणि मग ती दुसरी चिमणी उरलेला उपमा त्यांच्यासाठी ठेवून उडून गेली!
असा अंदाज लावत लावत माझा उपमा कधीच संपून गेला! आयुष्यात पहिल्यांदा मी न्याहारिचा उपमा एन्जॉय केला असेल!