19 December, 2009

मुलांची शिक्षणं.. मुलींची लग्न..


आज तिने एक बातमी वाचली.. रेमंड कंपनीबद्दल... ती कंपनी आता बंद होणार वगैरे. त्यात असा लिहिलं होतं - "लोकांपुढे आता काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्या कुटुंबाचं कसं होणार.. मुलांची शिक्षणं व्हायची, मुलींची लग्न व्हायची".. इतक्या वेळेपर्यंत कंपनीबद्दल आणि त्या लोकांबद्दल काळजी करणारी ती, या वाक्याला एकदम थबकली. तिला टी.व्ही. वर पाहिलेली एक जाहिरात आठवली. कशाची ते काही नीट आठवेना - कदाचित लाईफ इन्शुरंस किंवा तशीच कोणतीतरी.. ज्यात नीना कुलकर्णी आहे ती.. आणि त्यातलं एक वाक्य हि एकदम तिच्या मनात उमटलं.. "मुलांची शिक्षणं, मुलींची लग्न.. या सगळ्यात मला याचीच तर मदत झाली.." या अर्थाचं.. त्यानंतर मात्र बातमीमध्ये लक्ष लागेना.

ती विचार करू लागली.. तिच्या घरी लहानपणापासून मुलगी म्हणून कोणतीच वेगळी वागणूक जास्त प्रमाणात दिली गेली नव्हती. बाबा तर तिच्यावर खुश असायचे, तिच्या प्रत्येक कामाबद्दल, मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना अभिमान वाटायचा. क्वचितप्रसंगी सर्वांसमोर म्हणायचेदेखील.. "आमचा मुलगाच आहे हा.. आमची मान ताठ ठेवणार.. नाव मोठ्ठं करणार" शाळा-कॉलेजमध्ये असेपर्यंत आईसुद्धा तिच्या अभ्यासावर नीट लक्ष ठेवून असायची. हे सगळं तिला आठवलं. ती स्वत:ला म्हणाली.. "माझे आई बाबा वेगळे आहेत. ते असा विचार करणार नाहीत." पण तेवढ्यात तिला जाणवलं, गेल्या काही वर्षात हा आनंद, अभिमान कमी झाला नसला तरी पूर्वीइतका उत्साह मात्र दिसून येत नाही. आणि मग ती भानावर आली. "मुलींची लग्न" शेवटी मुलांची ती शिक्षणं आणि मुलींची ती लग्न.. हेच का ते आयुष्याचं ध्येय?

मनाची एवढी क्षणमात्र चलबिचल झाली खरी पण तरीही "Be the change you want to see in the world" असं म्हणून ती स्वत:शीच एकटीच हसली आणि तिनं पेपरचं पान उलटलं.

(Picture taken from wiki.)