Showing posts with label भाषा: मराठी. Show all posts
Showing posts with label भाषा: मराठी. Show all posts

27 January, 2011

नापास (न झालेल्या) मुलीची गोष्ट

"नापास होणं" यात चर्चा करण्यासारखं काय असतं - ते मला अजुन समजलेलं नाही! एखाद्या दिवशी आईनं केलेल्या पोळ्या चिवट झाल्या किंवा एखाद्या कोकणातल्या मुलीनं "मकई की रोटि, सरसोंका साग" वगैरे पहिल्यांदाच बनवलं आणि ते पुर्णपणे फसलं - तर आई आणि ती मुलगी नापास की काय?! नाहीच! कारण पोळ्या चिवट व्हायला नीट न दळलेल्या कणकेपासुन ते बर्नरची आच नीट न असणं अशा कित्येक गोष्टी कारणीभूत असू शकतात. तसचं त्या बिचार्या कोकणकन्येला आमसुलाच्या साराची सवय, तीला कसं लगेच "मकई की रोटि, सरसोंका साग" जमणार? तसंच आहे! १०० पैकी मार्क द्यायचे ठरवले तर त्या चिवट पोळ्यांनाही कदाचित ३५ मिळायचे नाहीत! after all, in the world of relative grading...! :)

आमच्या घरात मात्र "पास"/"नापास" ह्यावर इतर बर्याचशा घरांप्रमाणेच चविष्ट चर्चा मी नेहमीच बघत आले आहे. मग ती मी शाळेत असतानाची असो किंवा माझी भाची आत्ता शाळेत असतानाची असो! विषय आणि मुद्दे तेच! पास/नापास एकवेळ समजु शकतो माणुस कारण असे टप्पे माणसाच्या आयुष्यातली प्रगती (नक्की कसली?) दर्शवितात (म्हणे!). पण, साडे नव्याण्णव मार्क का मिळाले (अहो, म्हणजे १०० का नाहीत)? - अशा गोष्टी म्हणजे जरा जास्तच नाही का? या आणि अशा कित्येक प्रश्नांच्या सरबत्तीला मी तोंड दिलेलं आहे आणि माझी भाचीसुद्धा तोंड द्यायला हळुहळु शिकत आहे! असो!

माझ्या सुदैवाने(च म्हणावं लागेल), मला "पास/नापास" ला कधी तोंड द्यावं लागलं नाही. माझं शिकत असताना एक तत्व .. आरे बापरे.. नाही म्हणजे साधाच नियम म्हणा.. होता. तो म्हणजे - "परिक्षेचा फडशा पाडायचा". मला अभ्यास करायला, पेपर लिहायला, उत्तरं अधोरेखित करायला वगैरे वगैरे इतकं प्रचंड आवडायचं की ठरवूनदेखील मी शाळा-कॉलेज च्या परिक्षामध्ये कधी नापास झाले नसतेच बहुतेक! त्यामुळे एका प्रकारच्या प्रश्नांच्या सरबत्तीमधुन माझी सुटका झाली! पण त्यामुळे असं व्हायचं की - "एव्हढा चांगला अभ्यास करतेस, आणि काय ग आयत्या वेळेस अशा चुका करतेस - थोडं अजुन वाचलं असतंस, पाठ केलं असतंस, तर पैकीच्या पैकी मिळाले असते" अशा कॉमेंट्सना मात्र सामोरं जावं लागायचं. कोणी विशेषतः गणिताच्या बाबतीत मला असं म्हणालं की - "गणित बरोबर आहे पण मधल्या २ स्टेप्स खाल्यास! नाहीतर पैकीच्या पैकी मिळाले असते" - की मला एव्हढा प्रचंड राग यायचा! मला वाटायचं - त्या स्टेप्स काय लिहयच्या! - किती सोप्प्या आहेत त्या! शिक्षकांना तर कळेलही तेवढं!! अशा न आवडण्यार्या गोष्टी न केल्यामुळे जे काही मार्क्स जायचे तेवढ्याची बोलणी मात्र यायची वाट्याला!

पण "नापास" या शब्दाने खरंतर माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. पण तो खोटा-खोटा! म्हणजे - चौथीत असताना, शिष्यवृत्तीच्या सराव परिक्षेत, मी एकदा मजाच केली होती! म्हणजे बाईंनी सांगितलं पेपर-अ सोडवा आणि मी (झोपेत!) सोडवला पेपर-ब! झालं! MCQ असल्यामुळे पेपर चेक करताना फक्त पर्याय तपासले गेले आणि मी १०० पैकी २० मार्क्स मिळवुन चक्क नापास झाले! एकदम "नापास" असा मानसिक धक्का बसल्यामुळे (किंवा लोकांनी दिल्यामुळे) मी भोकाड पसरलं आणि नंतर माझ्या बाईंनाच शंका आली आणि सगळा उलगडा झाला!

असं एकमेव खोटं "नापास" सोडलं तर लोकांच्या दृष्टीनं महत्वाच्या अशा कुठल्या परिक्षेत नापास झाले नाही मी. मला नेहमी वाटायचं, कसं वाटत असेल नापास झालं तर? खरंच का ती आयुष्य संपवण्याइतकी लाजिरवाणी गोष्ट आहे? हळुहळु मला जाणवलं की लोकांकडुन नेहमीच "नापास" ही जाणीव करुन दिली जाणारच! आपण १०० % दिले असतील तर कुठलीच गोष्ट मनावर घ्यायची गरज नसते!

मजा म्हणजे - या कधीच नापास न झालेल्या मुलीबद्दल सगळ्यांना भारीच विश्वास निर्माण झाला होता आणि दुर्दैवानं तो "अभ्यास / शिक्षण" या पलिकडे गेला होता! म्हणजे ही "नापास" न झालेली मुलगी सगळीकडेच पास च होत राहणार असा दुर्दम्य (उगिच!) विश्वास! आणि त्यातच ती नापास झाली! कशात माहितिए? - चारचाकी गाडी चालवण्याच्या परिक्षेत! आणि तिथच तिला कळलं - की - ती आजवर कधी नापास झाली नाही कारण आजवर तिनं तिच्या मनासारखं केलं - मनाविरुद्ध केलेली / शिकलेली ही एकच गोष्ट - चारचाकी चालवायला शिकणं! अजुनही कोणी मला म्हटलं की घे आता चारचाकी आणि त्यातुन जा ऑफिसला - की मला ऐकुनच कंटाळा येतो.

theoretically मात्र आई.आई.टी. मध्ये कित्येक वेळा आम्ही "नापास" झालेलो आहोत! मग ते CS601 मधले 17/70 असोत किंवा अतिप्रसिद्ध CS636 मधले 5.5/35 असोत! ते मार्क्स घरी सांगायची वेळ आली नाही म्हणुन ठीक, नाहितर बोलणी अटळ होती! पण त्या 5.5 किंवा 17 मध्ये प्रचंड मजा होती! कधी कधी तर 5.5 हेच सर्वोत्तम मार्क्स असायचे! तेव्हा तर आनंद गगनात मावत नसे! :D अशा वेळी तर "नापास" हे गावीही नसायचं कोणाच्या!

पण जवळ्जवळ १२-१४ वर्षांनीदेखील माझ्या भाचीला त्या आणि तशाच प्रकारच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय म्हणजे खरंच कठीण आहे! "परिक्षा" आणि 'मार्क्स" या जगात हरवलेल्या लोकांमध्ये राहणारया एखाद्याला, ज्याचं/जिचं माझ्यासारखं परिक्षेवर प्रेम नाही आहे - अशांसाठी हे किती त्रासदायक ठरेल!

11 May, 2010

"ठिकरी"

व. पु. म्हटलं की खरंतर मी जरा धाकधुकीनच पुस्तक हातात घेते; कारण त्याचं लिखाण (मी जेवढं वाचलंय तेवढं) मला extreme वाटतं. म्हणजे "एक घाव दोन तुकडे" प्रकारचं. पण "ठिकरी" सकाळी हातात घेतलं आणि तासाभरात बघता बघता संपलंदेखील! पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं बोलकं! नेहमीप्रमाणे आधी पुस्तकाच्या मागच्या बाजूला पुस्तकातला एखादा परिच्छेद असतो तो वाचायला घेतला. तेव्हा कळलं की ही ठिकरी म्हणजे मला माहित असलेल्या टिपऱ्यांच्या खेळातली "टिपरी" - जिला खेळवणारा कोणी वेगळाच असतो; ती आपली या चौकोनातून त्या चोकोनात पडत जाते! म्हटलं तसं, पुस्तक हातात घेतल्यावर खाली ठेववेना. खरंतर स्त्रीप्रधान म्हणता येईल अशीच एक साधीशी गोष्ट! पण व. पुं.ची लेखणी लागल्यामुळे खूपच वेगळी वाटते. कित्येकदा अशी स्त्रीप्रधान / स्त्रीयांच्या प्रश्नांबाबत बोलणारी / त्यांच्या अत्याचाराला वाचा फोडणारी पुस्तक किंवा सिनेमे पाहून मला वाटतं की एखाद्याच्या आयुष्यात "सगळं कसं छान जुळून आलंय" म्हणतात त्याप्रमाणे एखादीच्या आयुष्यात "सगळंच कसं विपरीत घडत गेलं" असा कसं काय असू शकत - असा प्रश्न पडतो. अशा वेळेस गोष्टीपुरत का होईना "नशीब!" एव्हढं एकच उत्तर सापडतं! उदाहरणादाखल याच पुस्तकातलं एक वाक्य: "लग्नानंतर वेगवेगळे उपाय करूनही अनेकांच्या घरात पाळणे हलत नाहीत. पण असे हे अत्याचार झाले की हमखास अपत्याचं आगमन व्हायलाच हवं का? फसवणूक झाली म्हणजेही हाच अनुभव येतो."

असो!

शीर्षक: ठिकरी
लेखक: व. पु. काळे
प्रकाशन: मेनका
किंमत: ३०/- फक्त
पाने: ११०

10 May, 2010

राज्य-परिवहन मंडळाचा...!

आज सोमवार. मी मुंबईच्या (बोरीवली एशिआड बस) सकाळी ७ च्या गाडीचं आरक्षण करून ठेवलेलं शनिवारीच. सहा वाजून ४० मिनिटांनी मी बसथांब्यावर पोहोचले. पाहते तर एक बोरीवली आधीच येवून थांबलेली. म्हटलं, वाह! आज काय नशीब जोरावर आहे! ७ ची क्वचितच ७ ला येणारी गाडी आज चक्क २० मिनिटं आधी! धावत जाऊन त्या कंडक्टर मुलीला विचारलं, "७ ची बोरीवली ना?"
ती म्हणे - "७ ची लागेल इथे शेजारीच."
(मी मनात) - तरीच! एवढी लवकर कशी काय! तरी एकदा खात्री करून घ्यावी..!
मी लगबगीनं ते announce करणारे बसलेले असतात, त्यांना गाठलं.
"७ ची बोरीवली? लागलीये का?"
"७१०६.. नंबर आहे, बघा लागली असेल तर"
ऐकताचक्षणी मी धावत परत आले, म्हटलं ह्या लागलेल्या बसचा नंबर बघावा आधी! तर तो काहीतरी ८२xx होता. म्हटलं, जाऊ देत! थांबा आता ७१०६ ची वाट बघत. तसंही अजून ७ वाजायचे होते!

वेळ: ७.१५
(मी मनात) अजून कशी आली नाही बस? माझं घड्याळ मेलं एक नेहमी पुढं असतं. नक्की किती वाजलेत कोण जाणे!
हळूच शेजारच्याच घड्याळ दिसतंय का, प्रयत्न केला बघायचा - अरे! झालेत की सव्वा सात खरंच.
मी शेजारच्या वेदांतच्या आईला (मगाशी तो रडताना त्याच्या आईने "वेदांत, इथे ओरडायला लावू नकोस" म्हणून एक धपाटा घातलेला होता त्याच्या पाठीत :() - तुमची बस कोणती?
त्या: पावणे सात ची मुंबई सेन्ट्रल. लेट आहेत गाड्या म्हणे आज! तुमची?
मी: बोरीवली, ७ ची. हो ना! फारच उशीर झाला! पावणे सात म्हणजे!
(मी मनात) चला पावणे सातवाले लोकदेखील अजून थांबलेत.. असू देत..असू देत.. येईल हो बस!
तरी राहवेना, एकदा पुन्हा announcer कडे जाऊन -
"काय हो, ७ ची बोरीवली - ७१०६ लागली का?"
तिसराच एक माणूस : "ओ, हे तिकीट जरा adjust करून द्या हो.. सोलापूरचं आहे.."
announcer त्या माणसाला : बघू? मगाचपासून ३ वेळा ओरडलो होतो इथून, तेव्हा नाही गाडीत येवून बसायचं? आता आलेत adjust करायला!
मी : अहो काका, ७ ची बोरीवली...?
तो माणूस : केव्हा? बस लागलेलीच नाही आणि काय म्हणता तुम्ही?
announcer त्या माणसाला : काय बस लागली नाही? अं? कधीच लागली बस.. त्यानंताराचीसुद्धा एक गेली.
तो माणूस : कधी? अजिबात बस लागलेली नाही platform लाच!
मी (मध्येच) : ७१०६, तुम्ही म्हनालेलास ना हा नंबर?
announcer त्या माणसाला : खोटं बोलू नका. (register दाखवत) बघा, ७५३३.. केव्हाच लागली आणि सुटलीपण. त्यानंतरची हि ७६१२ बघा सव्वा सातला गेली ही पण.
तो माणूस : ओ, त्यांनी चढू दिलं नाही. इकडे adjust करायला आलो ना म्हणून तर!
announcer त्या माणसाला : मग खोटं का बोललात आधी? बस लागलीच नाही म्हणून? आणा हिकडं ते!
मी (पुन्हा एकदा मध्येच) : ओ काका, बोरीवली...
चौथाच माणूस : बोरीवली शिवनेरी साडे सातची लागली का हो?
announcer या नव्या माणसाला : हां.. ती आहे बघा तिकडे. (बोट दाखवत)
(मी मनात) बस! झाला एवढा अपमान (?) पुरे झाला! तडक तिकडून निघून आले. पुन्हा बस ची वाट बघत.

वेळ: ७.३०
एका निम-आराम २ x २ बोरीवलीच्या बसचं आगमन झालं! म्हटलं, यांना एकदा विचारून पाहू, बस लेट आहे तर नेतात का या तिकिटावर?
मी: ओ काका, ७ ची बोरीवली लेट आहे, या बस मध्ये adjust होईल का तिकीट?
कंडक्टर काका: काय? ७ ची? आहो, गेली असेल ती केव्हाच!
मी: नाही, मी पावणे सात पासून आहे इकडे. नाही आलेली बस. लेट आहे. बघा ना इकडे adjust होतंय का?
कंडक्टर काका: असं कसं? तिकडं विचारून या एकदा.. गेली असणार बस!

मी घाबरले, तडक announcer कडे -
मी : ७१०६, ७ ची बोरीवली लागली नाहीच का अजून? साडे सात होवून गेले की!
announcer : ती? ती गेली की ८२६० सोडली तिच्याऐवजी.
मी : कधी? तुम्ही तर ७१०६ सांगितलेलं. मी कधीची थांबलेय वाट बघत.
announcer : ओ नाही.. तीच्या ऐवजी सोडली. बघू तिकीट...
हा.. २४ नंबरचं सीट ना? मगाचपासून ३ वेळा ती मुलगी (कंडक्टर) येवून विचारून गेली, होता कुठं तुम्ही? ती बस गेली ७ लाच!
मी : (मनातच..) असं कसं शक्य आहे! मग मी मगाशी विचारलं तेव्हा? काय झोपा काढतात का ही लोक?
मी काकांना : मग आता? पुढची बस कितीला आहे?
announcer : आता ८ ला आहे बघा. मी इकडे लिहून देतो. तिकिटाच्या माग.. ८ ची पकड आता!
मग त्याने "पुढील बसमधून प्रवासदर वजावळ" असं काहीतरी तिकिटावर (माग) लिहून मला उपकृत केलं.

मी धावत त्या बसपाशी आले.
मी : ओ काका, ती बस खरंच गेली! या बस मध्ये करा की adjust ! लिहून आणलंय तसं.
काका : नाही अहो, ही extra गाडी आहे. यात reservation adjust होत नसतं.
(मग तिकीटाकडे पाहून) - शिक्का नाहीये आणि यावर!

(आता मला काय स्वप्न पडलेलं की तो माणूस adjust केलं तिकीट की शिक्का देखील मारतो? सही तर त्याने केलेलीच!)

मी पुन्हा announcer कडे. या वेळेस वेगळाच माणूस होता! त्याला direct म्हटलं, "ओ, यावर शिक्का नाहीये". त्यानेदेखील काही न बोलता मारला शिक्का. :-o


मी पुन्हा त्या बसपाशी. बस जवळजवळ निघण्याच्या बेतात.
"ओ काका, आहे आता शिक्का, करा की adjust!"
"आवो, नाही होत extra गाडीला.."
"बर! मग याचं तिकीट किती?"
"१५०.. कशाला पण? येईल न ८ ला पुढची गाडी.. का उगीच ५ मिनिटासाठी?"
असं म्हणून त्याने गाडीचं दार बंदच केलं direct!

वेळ: ८.२०
मी जवळजवळ रडकुंडीला! बस न मिळण्यापेक्षा पैसे वाया जाताहेत की काय? या कारणानेच जास्त! हे तिकीट वाया गेला तर? पुन्हा १५०! नाहीSSSS...वगैरे!
तेवढ्यात कुठूनतरी "दादर चला दादर" अशी हाक ऐकू आली. मी direct चढलेच त्या बस मध्ये. मग त्या कंडक्टर ला (हो, हा काकाच्या वयाचा नवता :D) म्हटलं - "दादर? कितीची आहे? ८?"
तो : "नाही. ही extra आहे"
मी (मनात) : कर्म माझं!
पण मी almost त्या बस मध्ये जाऊन चढलेच होते. म्हणून मग...
मी त्याला : माझं हे तिकीट adjust ...
(पुढे काही बोलण्याआधीच..)
तो : तू आधी बसून घे. नंतर जागा मिळायची नाही.
मी (मनात) : पण आधी तिकिटाच विचारू.. नंतर म्हणेल नाही होणार adjust!
मी त्याला : नाही, पण हे extra गाडी..?
तो (पुन्हा) : आधी बस पाहू. तिकडं माग जागा आहे.
मी बसले एकदाची. मनात धाकधुक होतीच, म्हटलं, नंतर म्हणायचा - आधी का सांगितल नाही? आता दे तिकिटाचे पैसे!
पण नंतर मात्र त्याने अजिबात पैसे वगैरे मागणं तर सोडाच! पण तिकीट नुसता पहिला आणि विचारलं - की कधीची बस होती? - बस, एव्हढंच!
गेल्या दिड तासात मी पहिल्यांदा "हुश्श" केलं असेल! हा आत्ताचा कंडक्टर आणि ते मगाचचे २-३ जण सगळी राज्य-परिवहन मंडळाचीच माणस! पण केव्हढा फरक!

28 April, 2010

शाब्बास!

हे आवडलेले आहे! :) अतिशय!!

(I hope, ही लिंक पुढे-मागे डेड होणार नाही!)

24 April, 2010

आम्ही (होऊ घातलेले) उच्चवर्गीय अर्थात माजी(?)-मध्यमवर्गीय!

गेल्या काही दिवसांपासून मी "पैसे बचाव" अभियान सुरु केलंय. अर्थात अभियान म्हटलं असलं तरी त्याची व्याप्ती माझ्यापुरतीच आहे. म्हणजे काही गोष्टींमध्ये पैसे उगीचच खर्च करायचे (की उडवायचे?) नाहीत असा नियमच बनवून टाकलाय. उदाहरणार्थ - बऱ्याचवेळेस बाहेरचं खाल्लं जातं - त्याला काटछाट - किंवा एखादी आवडलेली वस्तू (बऱ्याचदा) गरज नसली तरी घेतली जाते तसं न करणं वगैरे. एक साधारण मध्यमवर्गीय, म्हणजे खाऊन पिऊन सुखी कुटुंब लक्षात घेतलं तरी कित्येकदा त्यामागे त्याकरिता आई-बाबांनी केलेल्या अडजस्टमेंट्स असतात. जसं जसं आपण अधिकाधिक स्वतंत्र होऊ लागतो, स्वत:च्या पायावर उभे राहतो आणि बऱ्याचवेळेस या गोष्टीने समाधानी असतो की आता आपल्या पालकांना आपल्यासाठी खर्च करावा लागत नाही; त्याच आनंदात आणि उत्साहात आपण कदाचित थोडा जास्तच खर्च करू लागतो! म्हणजे आज काल थोड्याफार फरकाने असंच दिसून येतं की, साधारण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालं की रग्गड पगाराची नोकरी - मग ती कुठेही असो - आणि मग त्यासोबत आलेलं financial freedom. २५-२६ व्या वर्षी जेव्हा आपली आधीची पिढी नोकरीने स्थैर्य आलं की संसार थाटायची तिथे आपल्या पिढीतले बहुतांश लोक घर किंवा गाडी मध्ये फक्त स्वतःच्या हिमतीवर गुंतवणूक करू लागले - अशी गुंतवणूक आपल्या आधीच्या पिढीने over the years केलेली दिसते. अगदीच एखादा नोकरी ऐवजी शिकत असला तरीदेखील ज्या तुलनेत आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांना पैशाचा स्वातंत्र्य असे, त्यामानानं आपल्या पिढीला खूपच जास्त आहे.

माझ्या स्वतःच्याच बाबतीत मी याचं विश्लेषण केलं. घरी असायचे तेव्हा रोज नेहमीचं पोळी-भाजी-भात आमटीचं जेवण - केव्हा केव्हा चटणी/कोशिंबीर/पापड.. सणासुदीला पक्वान्नं आणि कोणी पाव्हणे असले तर काही विशेष.. म्हणजे फार फार तर पुलाव / बिर्याणी अशा व्हरायटीज किंवा पोळीऐवजी एखाद वेळेस पुरी.. पाव भाजी किंवा पिझ्झा किंवा तत्सम पो.भा. प्रकारात न मोडणारे so-called one dish meal म्हणजे डोक्यावरून पाणी. पण जे काही जेव्हा केव्हा केला जायचं त्यात काय मजा असायची! म्हणजे मला आठवतंय, असाच घरी एकदा काहीतरी समारंभ होता आणि मला काकडीच्या कोशिंबिरीसाठी काकडी कोचायचं काम दिलेलं! मला काकडी कोचायाला फार आवडतं :D त्यामुळे साहजिकच मी ते अगदी मन लावून करते. तेव्हा माझी आजी प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगत होती - बघा, किती छान कोच्तेय काकडी - अगदी बारीक, कुठेही मोठ्या फोडी उरल्या नाहीएत - वगैरे वगैरे.. :D तसंच एकदा फ्रुट-सलाड करताना जी फळांची टरफलं आणि साली फेकून दिलेल्या त्यात कुठलीशी चीजवस्तू (कात्री किंवा सुरी वगैरे) देखील फेकून दिली गेलेली - म्हणजे ती वस्तू काही नंतर सापडली नव्हती :D असो! तेव्हा खरोखर असेल त्यात समाधान मानण्याची वृत्ती होती. नशिबाने अजून देखील घरातले लोक तसेच आहेत - मृगजळामागे न धावता, आहे त्यात सुखात राहणारे; पण मग कधी कधी मीच बदललेय की काय असं मला वाटू लागतं!

घरापासून दूर राहायला लागल्यावर एक गोष्ट फार अंगवळणी पडू लागते - ती म्हणजे आपण एकटे पडू लागलोय असं वाटलं की कितीही नापसंत लोकांसोबत जुळवून घ्यावं लागतं - म्हणजे एकटेपणापेक्षा ते बरं - असं! मग कधी त्या मित्रांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा आपल्यालाच सवय होऊन जाते म्हणून म्हणा - आपण खूप पैसे उडवू लागतो - म्हणजे वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पासून ते नोकरीच्या सेलिब्रेशनपर्यंत. आज काल जसं लहान मुलांच्या ग्रुप्समध्ये बर्थडे गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट अशी एक प्रथा (?) निर्माण होऊ घातलीये, तसंच काहीसं आपल्याही बाबतीत होतं. म्हणजे २ ऑप्शन्स असतात. पहिला म्हणजे आपल्या मनाविरुद्ध (बऱ्याचवेळेस)- "त्याने नाही का त्याच्या बर्थडेला मोठ्ठी पार्टी दिली? मग मला द्यायला नको का?" असं कारण देवून आपण हे आपल्या अंगवळणी पाडून घ्यायचं; आणि दुसरा ऑप्शन म्हणजे या सगळ्यापासून चार हात दूर राहायचं. मी दुसऱ्या मार्गाचा अवलंब कित्येक वर्षं केला; मध्ये काही वर्षं पहिल्या मार्गाकडेदेखील वळले पण लवकरच दुसरा मार्गचं योग्य वाटू लागला आहे पुन्हा एकदा. याचं कारण माझं मी केलेलं विश्लेषण. अगदीच ढोबळमानानं सांगायचं झालं तर फक्त मेसच्या जेवणाचा कंटाळा म्हणून मी कित्येक वेळा बाहेरच खाते. पण मग त्यातही बऱ्याच वेळेस भुकेपेक्षा जिभेचे चोचले पुरवणचं अधिक होऊन बसतं! म्हणजे असं लक्षात यायला लागलं कि मेस मध्ये नको म्हणून बाहेर एखाद्या ठिकाणी पोळी-भाजी मिळत असूनदेखील मी पिझ्झा ऑर्डर करू लागले. यात खर्चदेखील वाढला. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मला मी १.५ महिन्यात जवळ जवळ २००० रुपये फक्त खाण्या-पिण्यावर खर्च केले असं लक्षात आलं तेव्हा फार अपराधी वाटू लागलं. आणि तेव्हा लक्षात आलं कि मी कळत-नकळत पहिल्या मार्गाचा अवलंब केला होता - सवयीनं! म्हणून मग पैसे बचाव या नावाखाली पुन्हा एकदा एक balanced आयुष्य सुरु करायचं ठरवलं.

मला खात्री आहे की प्रत्येक असा माणूस जो मित्रांसोबत किंवा घरापासून दूर राहतो, तो थोड्या-फार फरकाने असाच करत असणार (जे नाहीत, त्यांचा खरच कौतुक!) म्हणजे खाण्यावर नसेल कदाचित पण पिक्चर म्हणा / कपडे म्हणा / भटकणं म्हणा.. कोणतीतरी गोष्ट नक्कीच प्रमाणाबाहेर करत असणार. कधी कोणाच्या आग्रहाखातर किंवा कधी आपोआप सवय होऊन गेली म्हणून. अर्थात पैसे कसे आणि किती खर्च करायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे; पण given that you belong to a middle class family, कुठेतरी मनात हे कायम टोचत राहतं की ज्यांनी आपल्याला या लायक बनवलं त्यांना अजूनही त्याच परिस्थितीत ठेवून आपण मजा मारतोय. यात अजून एक गोष्ट देखील असते. बर्याचदा असं होतं की आपली आधीची पिढी तेवढी flexible नसते - उदाहरणार्थ, समजा तुम्ही ठरवलं की आपण आपल्यासाठी कपडे घेण्यावर एवढे पैसे खर्च करतो, आई साठी एक मस्त भारीतली साडी घेऊ- पण साडी दिली की तिची दुसरी रियाक्शन अशी असते की - केव्हढी महाग आहे - काय साड्या कमी आहेत होय मला? (अर्थातच पहिली रियाक्शन - वाः छान आहे, आवडली - अशीच असते :)) किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना महागड्या हॉटेलात बर्थडे ट्रीट दिली म्हणून तुम्ही आई-बाबांना म्हणालात की चला आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरी काही करण्यापेक्षा आपण पिझ्झा मागवू - तर ते बऱ्याचदा नाहीच म्हणतील. त्यांची आपल्याकडून यातली कुठलीच अपेक्षा नसते. आणि मग कधी कधी त्यांच्या या rigidness ला कंटाळून म्हणा किंवा काहीही, आपण आपल्याच आयुष्यात हे सगळे करत राहतो. पण मग आपलेपणाची मजा गमावून बसतो. सगळ्यांसमोर नातीचं कौतुक करणारी आजी miss करतो; आणि छान हसत खेळत, एकमेकांना मदत करत केलेल्या स्वयंपाकाची गोडी देखील miss करतो.

उगीच नाही, पिझ्झ्याचा समाचार घेतल्यावरदेखील "चिंच-गुळाची आमटी पाहिजे.." किंवा "मला मटार उसळ खायचिए.. आत्ता लगेच" असे स्टेटस मेसेजेस chat वर टाकत आपण! किंवा, westside / fab india मधून घेतलेले expensive कपडे सोडून traditional day ला घरून आईचीच साडी घेवून येत! उगीच नाही, कोणी गणपतीसाठी घरी गेलं की मोदकांची फर्माईश करत, आणि उगीच नाही "ही पुरणपोळी.. मराठी लोकांमध्ये करतात होळीला" असं म्हणून आपल्या समस्त अमराठी मित्र-मैत्रिणींना ती आग्रहाने खायला घालत! कधी कधी मला वाटतं, आपण अजिबात बदललो नाहीये.. आपले विचार अजूनदेखील आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाभोवातीच फिरत आहेत. :) आणि असं वाटलं की अचानक एक समाधान अनुभवायला मिळत! आपण अजिबात एकटे नसल्याचं!

19 April, 2010

चलाम 'च'ची चषाभा चतये चहीना!

काही गोष्टी आपल्याला लहानपणीच शिकवल्या जातात. उदाहरणार्थ काही बडबडगीतं, काही कविता, चिऊ-काऊच्या गोष्टी - आणि हो! 'च' ची भाषा! पण मला ती कधीच बोलता आली नाही. टायटलात लिहिलंय खरं, पण तेदेखील चूक आहे कि बरोबर माहित नाही! आणि नुसतं बोलता येत नसेल तरी एक वेळ ठीक! पण मला समजायचीदेखील नाही! माझं स्पष्ट मत आहे की 'च' ची भाषा एक अत्यंत अवघड भाषा आहे. मला त्या 'च' भाषेतलं वाक्य असं "rum_time" किंवा "on_the_fly" बनवताही यायचं नाही आणि "parse" तर त्याहून करता यायचं नाही! म्हणजे कोणी काही बोललं तर मला पुन्हा एकदा ते मनातल्या मनात बोलून बघावं लागायचं. कधी कधी ते डोळ्यासमोर हवेतल्या हवेत लिहून बघावं लागायचं. तरीदेखील मला नेहमी कळायचंच असं नाही! आणि त्यामुळे माझा या 'च' नामक भाषेवर फार राग आहे!

तसंच या 'च'च्या भाषेने मोठेपणीदेखील कित्येकदा मला त्रास दिलेला आहे. जसं की, माझी भाची (ती लहान असताना) काही गोष्टींसाठी फार हट्ट आणि रडारड करायची (सगळेच करतात म्हणा!) म्हणून तिला कळू नये अशा हेतूने घरातलं कोणीतरी मला काहीतरी "कोड लेंग्वेज" मध्ये सांगायचं आणि त्यांना ही 'च'चीच भाषा फार आवडायची! नंतर नंतर तर माझ्या भाचीलासुद्धा कळायचं की हे मोठे लोक काय लपवताहेत पण मला अजिबात नाही.. :( मला तर वाटतं की, तिच्यासारखंच माझ्या लहानपणीदेखील हे सगळे 'च'च्या भाषेत बोलत असणार मला कळू नये म्हणून, आणि त्यामुळे मी ती भाषा अजूनदेखील कधीच शिकले नाही! :D

चणूनम्ह चलाम 'च'ची चषाभा चजिबातअ चवडतआ चहीना. चश्शहु..! आपलं ते.. हुश्श! :D

15 April, 2010

प्रार्थना

आज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर "कराग्रे वसते लक्ष्मी" म्हणण्याकरता हात जोडले; आणि एकदम वाटलं की या हातात आणि नमाज पडत असलेल्या माणसाच्या हातात फरक काय? यापैकी कोणता माणूस "अल्लाह हो अकबर..." म्हणतोय आणि कोणता "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती.." म्हणतोय? नाही ना सांगता येत?
(चित्रं येथून व येथून घेतली आहेत.)

05 April, 2010

गांगुलीमय मी!


"गांगुली" या शब्दाने माझ्या आयुष्याची काही वर्षं व्यापलेली आहेत. म्हणजे, अचूक सांगायचं तर (मी) आठवीत असल्यापासून ते गांगुलीने क्रिकेट ला राम राम ठोकला तोपर्यंतची सगळी! खरं तर क्रिकेट ची मेच आणि "आमची माती आमची माणसं" एकाच आवडीने पाहणारी मी! एकदा केव्हातरी गांगुलीला पाहिलं आणि माझी विकेटच उडाली. नेमकं कोणती मेच होती ते काही आठवत नाही.. हे महाशय पेटले होते आणि अगदीच काही शंभरी वगैरे नाही पण धावफलक बर्यापैकी हलता ठेवला होता. त्या मेच मध्ये हारलो कि जिंकलो हे सुद्धा मला आठवत नाही. पण एक नक्की कि त्यानंतर मी जी काही क्रिकेटवेडी.. आह! नाही.. गांगुलीमय झालेय.. ते अगदी आजतागायत आहे.

मला गांगुलीबद्दल सगळ्यात जास्त काय आवडतं? हे सांगणं महाकठीण काम आहे. अगदी त्याच्या ठोकलेल्या सिक्सर पासून ते टेन्शनमध्ये असतानाचं त्याचं नखं कुरतडणं. किंवा मैदानावर प्रचंड माज दाखवण्यापासून ते "well played boys" म्हणत सगळ्यांची पाठ थोपटणं. सगळंच! स्वयंपाकघरात पाउल न टाकणारी मी, गांगुली ने शंभरी गाठली की शिरा करायचे! आणि तो आउट होऊ नये यासाठी त्याच्याही पेक्षा जास्त अंधश्रद्धाळू बनायचे.. म्हणजे.. एकदा आम्ही केरम खेळत असताना दर वेळेस माझी सोंगटी गेली की तो चौकार / षटकार मारत होता. काय प्रचंड एकाग्रतेने खेळलेले मी त्या दिवशी केरम! फक्त त्याची शंभरी व्हावी म्हणून. दहावीच्या परीक्षेची तर वेगळीच मजा! संस्कृत चा आवडता पेपर होता. २ दिवस सुट्टी होती आणि त्यातल्या दुसर्या दिवशी मेच. २ दिवस सुट्टी आहे - असं म्हणून पहिल्या दिवशी काहीच केलं नाही आणि रात्री आठवलं की मेच आहे उद्या! झालं.. निम्मा अभ्यास रात्री बसून केला. दुसर्यादिवशी प्रवचनाला बसल्याप्रमाणे टी.व्ही. समोर! नेहमीच्या जागेवर! का? कारण, मी तिथे बसले की तो चांगला खेळतो (आवरा! पण खरच केलंय मी असं :)) एवढंच काय! कधी कधी (खरतर बर्याच वेळेस) तो छानपैकी झेल देवून बाद व्हायचा.. आणि मग असं ओळीने २-३ मेच मध्ये झालं की डोळ्याच्या कडा ओलावायच्या खरं :( एकदा तर मेच संपल्यावर मी रात्री बराच वेळ रडत देखील होते. नाही - लहान वगैरे नव्हते मी तेव्हा! पण काय करणार! व्हायचं खरं असं :-|

गांगुली आणि माझं एक निराळाच नातं आहे! त्याला काय म्हणावं काय माहित? काही अविश्वसनीय अशा गोष्टी घडल्यात खर्या. त्यातली एक महत्वाची म्हणजे, २६ मे १९९९ ची. २४ मे ला वाढदिवसानिमित्त मैत्रिणी घरी आलेल्या, आणि मग २६ तारखेला कुठेतरी ट्रीपला जाण्याचा विषय निघाला. सगळे उत्साहाने तयार झाले कारण दहावीची सुटी चालू होती! जवळ जवळ ठरलं सगळं आणि मी रात्री मैत्रिणीला फोन करून येणार नाही असं सांगितलं. कारण? अर्थातच २६ ला मेच होती. आपण-श्रीलंका. विश्वचषकामधली. का कुणास ठावूक, ती मेच बुडवू नये असं मला अचानक वाटून गेलं. त्यामुळे मैत्रीणींना प्रचंड माज दाखवत मी गेलेच नाही फिरायला. आणि काय सुरेख गेली ती संध्याकाळ! १८३ धावा! एकदिवसीय मेच मधल्या सर्वोत्तम त्या दिवशी गांगुली ने केल्या. शिराच काय पंचपक्वान्नांच जेवण ही बनवायला मी तयार होते त्या दिवशी :D

कुठलीशी मेच होती अशीच.. कांगारुंसोबत. शारजाहला असावी बहुतेक (आठवत नाही) कारण ती आपल्याकडे मध्यरात्री २.३० ला सुरु होणार होती. झोपताना बाबांना सांगून ठेवलेले कि मला २.३० ला उठवा, जे त्यांनी केलं नाही. :( आणि तेव्हा मला स्वप्न पडलं की कुठलीशी मेच सुरु आहे आणि त्यात गांगुली ने २ विकेट्स घेतल्यात! त्या आनंदातच मला जाग आली आणि चमकलं की - आरे! मेच! साधारण ३.३०-४ वाजले असावेत. ताडकन उठले आणि टी.व्ही. लावला. कांगारू होते २१-२ वर आणि त्यातली १ विकेट गांगुली ने घेतलेली! अजून देखील यावर विश्वास बसत नाही की खरच असं घडलं होतं!


काही आवडू लागलं की त्याच एका गोष्टीबद्दल वाचलं जातं.. तेव्हढाच विचार केला जातो.. माझंही तसंच झालं! गांगुली बद्दल मिळेल ती आणि मिळेल तिथून माहिती मिळवायचे मी. त्याच्या त्याच त्याच इंनिन्ग्स, तेच तेच इंटरव्हू, त्याच त्याच बातम्या - अक्षरश: पारायण करायचे. दहावीच्या सुट्टीत त्याचं स्केच काढायचं ठरवलं. त्या आधीचे स्केचिंग चे सगळे प्रयत्न अयशस्वी होवून देखील! म्हणजे आधी काढलेल्या ८-१० स्केचेस पैकी काजोल आणि वाजपेयी सोडून कोणीच त्या खाली लिहिलेल्या नावाप्रमाण दिसत नसायचं. पण हे चित्र फार म्हणजे फारच हिट झालं. माझ्यामते ते काही अति उच्च वगैरे नाही आहे पण लोकांना खूपच आवडलं (किंवा ते तसं म्हणाले तरी!) असो! तर असं हे माझं गांगुली-प्रेम उतू जात होतं. शाळेत असल्यापासून मी त्याची बरीचशी चित्र (पेपर / मासिकात येणारी), तसंच त्याच्यावर येणारे लेख, असं बरंच काय काय गोळा करून ठेवलेलं.. त्याची एक छानशी वही पण बनवलेली. पण नंतर नंतर आधी कौतुकास्पद वाटणारी हि गोष्ट घरच्यांना वेडेपणा वाटू लागली आणि मग एक दिवस मी स्वतःच चिडून जाऊन ती वही फाडून टाकली.. एव्हढंच नव्हे तर माझ्या अभ्यासाच्या टेबलाला लावलेलं त्याचं पोस्टर (ज्यावरून हे स्केच काढलं) ते हि फाडून टाकलं :-| (पुन्हा एकदा - असो!)

हे गांगुली-प्रेम इतकं होतं की मेच असली की माझी आजी देखील अगदी आठवणीनं विचारायची - काय ग, तुझ्या गांगुली ने किती रन्स केल्या? :) त्याने तिकडे क्रिकेटला राम राम ठोकला आणि मी ही मेच बघण्याला. पण परवा एकदा कुठलीशी मेच टी. व्ही. वर चालू होती, तेव्हा अचानक गांगुली चा आवाज कानावर पडला आणि मी बसल्या जागी उभी राहून नाचायलाच लागले. तेव्हा आजी म्हणाली देखील - आहे का अजून पण तो वेडेपणा! मिनिटभरापूर्वी मी त्या टी. व्ही कडे ढून्कुनदेखील पाहत नव्हते आणि आत्ता त्याच्यासमोर जाऊन उभी राहिलेले! काय करणार, इतक्या वर्षांनी त्याचं असं दर्शन झालं ना! :)

माझ्या गांगुली-प्रेमाचा लोकांना काय अपार कौतुक! का? सोप्पं आहे - त्याचा वाढदिवसाला म्हणजे ८ जुलै ला मी सगळ्यांना चोकोलेट्स वाटते ना! मग का नाही करणार ते कौतुक :D २ वर्षांपूर्वी तर "HBD" (अर्थात Happy Birthday, Dada!) या स्टेटस मागचं रहस्य ओळखल्याबद्दल हर्षदाने माझ्याकडून BJC मध्ये ट्रीट देखील उकळली आहे! दिली आपली मी! :P प्रेम आंधळं असतं म्हणतात ते हेच! :D

23 January, 2010

चकवा :P

मी शाळेत असतानाची गोष्ट. नववीतली. मी तेव्हा सकाळी बाबांसोबत आजीकडे यायचे आणि मग तिथेच थांबून दुपारी शाळेत चालत जायचे. रेणुका स्वरूप मध्ये आजीच्या घरून म्हणजे सदाशिव पेठेतून जाण्यासाठी एक टिळक रोड सोडून बाकी काही माहित असण्याची गरज नसल्यामुळे मला बाकीचे रास्ते माहित असायचा प्रश्नच नव्हता ! नाही म्हणायला तुळशीबागेतले सगळे रास्ते आणि गल्लीबोळ माहित होते म्हणा. पण कोणी मैत्रीण कोथरूडहून येते म्हणजे नक्की कुठून येते वगैरे प्रश्नांशी माझा काही संबंधंच नसायचा. एव्हढंच काय, माझी अगदी खास मैत्रीण शानिपारापाशी राहते हे मला माहित असलं तरी मला शाळेतून तिच्या घरी एकटीला जायला रस्ता कधीच सापडायचा नाही. रस्त्यांच्या बाबतीत माझं घोर अज्ञान आहे हेच खरं! म्हणजे तो चकवा असतो ना.. की एखाद्या वळणावर उगीचच आपल्याला भासवतो की आता वळायचं आहे, तसं मला प्रत्येक वळणावरच वाटतं. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे, मी खूप वर्ष आई किंवा बाबांबरोबर ठिकठिकाणी गेलीये. थोडक्यात एकटीनं नाही. त्यामुळं, रस्ते लक्षात न ठेवण्याचीच सवय लगेच लागली. अकरावीत जेव्हा बस ने स.प. ला जायला लागले तेव्हा कुठं मला रस्त्यांचं "भान" आलं. मग गाडी वापरू लागल्यावर तर ते ज्ञान जरा अधिकच वाढलं. असो.

तर नववीत असताना NCC साठी आम्ही सगळे सेनापती बापट रोड च्या सिम्बायोसिस च्या ग्राउंड वर जायचो. तिकडे बसने जा - ये करायचो. पण सगळे एकत्र असायचे, शाळेत भेटून मग तिकडून शनिपार च्या बसस्टोप वर आणि तिकडून बस - असंच परतताना. त्यामुळे मी रस्ते लक्षात ठेवलेच नाहीत कधी. एकदा कुठल्याशा परीक्षेसाठी कि काहीतरी म्हणून मला तिकडून लवकर निघावं लागलं. मी आत्मविश्वासाने (!) रिक्षापेक्षा बसनेच यायचं ठरवलं. बस मिळून शनिपार गाठलं देखील. आणि निघाले शाळेकडे. नेहमीप्रमाणे चकवा लागला :) प्रत्येक वळणावर वाटायचं, आरे इकडे वळलं की शाळेचा रोड येतो का? कि नाही, इकडे वळलं की माझ्या मैत्रिणीचं घर येतं वाटतं..असं करत करत चुकून एका ठिकाणी वळलेच मी ! पोहोचायला उशीर होईल असं वाटायला लागलेलं. वाटलं सरळ रिक्षा करावी. पण मग मला वाटलं, शाळा जवळच असेल कुठेतरी तर कशाला उगीच पैसे घालवा! :D एका बाईंना शेवटी विचारलं - अहो इथून रेणुका स्वरूप ला कसं जायचं? त्यांनी हसतच सांगितलं. काय करणार! हसणं सहन करावं लागलं.. त्या तरी काय करणार! मी शाळेच्या गणवेशातच माझी शाळा कुठंय असं लोकांना विचारत होते!

असंच एकदा सातवीत असतानाची गोष्ट - आत्याने मला कसलीतरी स्पेशल नानकटाई किंवा काहीतरी आणायला "रिगल" बेकरीमध्ये पाठवलं होतं. "रिगल" ची स्पेशालिटी होती ती. चिमणबागेतून टिळक रोडला लागलं की डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा २ बेकरी होत्या. डावीकडं "सई बेकरी", उजवीकडं "रिगल बेकरी". मी निघताना लगेच पिशवी आणि पैसे घेवून पळत सुटले. चिमणबागेतून टिळक रोडला लागले आणि चकवा लागला. डावीकडचीच "रिगल" असं मनानं पक्कं सांगितलं आणि मी डावीकडं वळाले. तिकडं गेल्यावर दिसली "सई". म्हटलं, चालतंय - बेकरी ती बेकरी! पण तिकडे ती स्पेशल नानकटाई नव्हतीच! :( झालं! म्हटलं आता दुप्पट चालावं लागणार. एवढं कमी कि काय म्हणून माझा आत्तेभाऊ बसस्टोप वर भेटला. त्याला म्हटलं नानकटाई आणायला पाठवलंय मला. मग झाले त्याचे प्रश्न सुरु - इकडे कुठे आलीएस मग? "रिगल" तर तिकडे आहे ना! वगैरे वगैरे. मी मग कबूल करून टाकलं त्याच्याकडे की - हो, मी "सई" लाच "रिगल" समजले. गोंधळ झाला. झालं! त्याला आयतं कारणं मिळालं हसायला. वर उशीर झाला म्हणून घरी "गर्दी" होती बेकरीत असं सांगावं लागलं ते वेगळंच!

02 January, 2010

द्विधा

(काल्पनिक)

"मग आता तुझं शिक्षण संपल्यावर काय करणार तू?"

"काय म्हणजे काय? करेन जॉब नाहीतर पुढे शिकेन अजून.."

"काय पण म्हणजे?"

"बघू गं.. हे होऊ देत आधी.. तोवर ठरवेन मी.."

------------------------------------------------------------------------------------------------

"जॉब ना.. मला काही फरक पडत नाही फारसा.. पुण्यात मिळालं काय किंवा बाहेर जावं लागलं काय.. माझी तयारी आहे.. जोवर भारत सोडवा लागत नाहीये"

"हम्म.. मला माहितीये.. तुला पुण्याबाहेरचा का चालणारे ते.."

"अस्सं?"

"हम्म.. म्हणजे मग आत्याची भुणभुण नाही तुझ्यामागे लग्न कर लग्न कर.."

"हा! well.. that is like an additional thing.. a perk to me.. पण ते काही कारण नाहीये.. मला जिथे कुठे माझ्या करिअर साठी चांगली संधी मिळेल तिथे जायची माझी तयारी आहे.."

"हम्म.. समजतंय.."

""

------------------------------------------------------------------------------------------------

"हे बघ.. सगळं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं.. शिक्षण.. नोकरी.. लग्न.. मुलं-बाळं.. त्यांची शिक्षणं.. लग्न....."

"अगं बास.. कळलं.."

"कळलं नाही तुला.. कळतच तर नाहीये.. आता जे करायला हवं ते करत नाहीएस.. मनाप्रमाणे शिकू दिलं ना.. आता आमचंही ऐक जरा.."

"अगं पण.."

"पण बिण काही नाही.. आपण नाव तरी नोंदवू या.. मुलं बघू या तरी.. तुला पसंद नसेल तर आम्ही काही बळजबरी करणार आहोत का?"

"हा! ते शक्य नाही.. पण मी म्हणतेय.. कशाला हा अट्टाहास? मिळालं कोणी.. आवडलं कोणी.. करावसं वाटलं लग्न तर करावं.. उगीच काय!"

"पुन्हा तेच.. सांगितलं ना.. वेळच्या वेळी झालं की बरं असतं.. समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर काय!"

"बासच!"

""

------------------------------------------------------------------------------------------------

"अगं आत्या, आत्ता ही नाही नाही म्हणतेय.. बघ उद्या तुमच्यासमोर एखाद्याला आणून उभं करेल म्हणेल.. घ्या.. हा तुमचा होणारा जावई.."

"exactly! मी हेच सांगतेय तिला कि कोणी आवडला तर नक्की करेन.. पटलं पाहिजे न पण!"

""

------------------------------------------------------------------------------------------------

"तुझे बाबा आता रिटायर होतील.. काही वर्षांनी.. मग तू काय करणारेस?"

"म्हणजे?"

"अगं, म्हणजे मग काय पुढे?"

"एक मिनिट.. ते रिटायर झाले की ते काय करणारेत असं त्यांना विचारायचं का तुला? तू चुकून मला विचारतेयेस का?"

"अगं.. तुझंही शिक्षण होईल आता.. मग पुढं...."

"सांगितलं कि तुला.. जॉब किंवा पुढे शिकेन.. depends on what kind of opportunities I get.."

"तुझ्यासाठी मुलं बघायला लागायचं असं आम्ही ठरवलंय.."

""

"तुझ्याशी बोलतेय मी.."

"हो. ऐकलं.. ठरवलेय! मग ठीके! बघा"

"अरे वाह! चक्क तयार झालीस.."

"hello.. मी म्हटलं तुम्ही ठरवलंय तर बघा.."

"म्हणजे? लग्न काय आम्हाला करायचंय? आम्ही नाव नोंदवणार.. मुलगा तू पसंद केलास कीच पुढचं.."

"बरं.."

"अशी कशी ग तू.. तुझ्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली.. एवढंच काय.. तुझ्या सगळ्या लहान मोठ्या बहिणींची सुद्धा झालीएत.. लोकं आम्हाला विचारतात.."

"लोकांना नाहीत उद्योग.."

"हो तुलाच तेवढे उद्योग आहेत.. बाकी सगळे निरुद्योगीच आहेत.. तुलाच काय ते तेव्हढ कळतं.. बाकीच्यांना अक्कलच नाही ना.."

"आवरा!"

"............." (काही ना काही बोलणं चालू आहे..)

""

"............."

""

......

------------------------------------------------------------------------------------------------

"तुझी अशी इच्छा आहे का की या वयातही तुझ्या बाबांनी तुझ्या भविष्याची काळजी करत बसावं?"

"काळजी? कसली?"

""

"अगं.. कसली?"

""

"ओह.. लग्न and all? तेवढंच ध्येय आहे का आयुष्यात? की त्याचा विचार करत आत्ता समोर असलेली संधी दुर्लक्षित करायची?"

"अगं.. लग्न झालं की तुला काय कोंडून ठेवणारे का? कर ना नंतर.."

"शक्य नाही कोंडून ठेवणं.. पण प्रश्न हा आहे की का त्याच्या मागे लागलीएस हात धुवून.."

"आपण शेवटी मुलीकडचे आहोत.. उशीर झाला तर मग अपेक्षा कमी कराव्या लागतील.. हवा तसा मुलगा मिळणार नाही.."

"अपेक्षा.. नाहीच्चेत पण माझ्या काहीच.. बस वागायला बोलायला नीट असला.. समोरच्याला रिस्पेक्ट देणारा असला.. आणि चारचौघात तमाशा न करणारा असला की बास.. आणि जो समोरच्याच्या मतांचा आदर करतो, त्याला रिस्पेक्ट देतो त्याच्यात इतरही बर्याच क्वालीटीज आपोआप च येतात.."

"बर.. आणि कोणत्या व्यवसायातला पाहिजे? तुझ्यासारखं शिक्षण कि बाकी काही?"

"doesn't matter.."

"आणि एकत्र कुटुंब की ..."

"आई.. काय नाव नोंदणीचा फॉर्म भरतेयेस का!?"

"नाही.. विचारून ठेवते.. ते तुझ्या काकांच्या शेजारी राहतात न.. त्यांचा बहिणीच्या जावेचा मुलगा लग्नाचा आहे.. तर तो आहे सी.ए. म्हणजे तुझं आणि त्याचं शिक्षण वेगळं.. तर..."

"आणि हे तुला कुठून कळलं?"

"अगं.. परवा गेलेले न काकांकडे.. तेव्हा ते आलेले.. मग असाच विषय निघाला की आता तुझे शिक्षण होत आलाय.. मग मुलं बघताय का.."

"तू काय सांगितलं त्यांना?"

"मी काही नाही.. म्हटलं.. तिच्या बाबांशी बोला.. तेच काय ते सांगतील.."

"वाह! मग ठीके..."

""

"पण मग हि extra ची माहिती कुठून मिळाली म्हणे?"

"अशीच विचारून ठेवली..."

:-o "बर!"

------------------------------------------------------------------------------------------------

(तिच्या डायरी मधलं एक पान..)
कधी कधी वाटतं, म्हणताहेत एवढं तर करून टाकावं लग्न. adjustment / compromise तर आयुष्यात नेहमीच करावं लागतं. मग काय बिघडलं? पण एवढं मागे का लागायचं? एकदा हेच म्हणतात, नशिबात असेल तेच आणि तेव्हाच मिळतं. हो न? मग मिळेल न नशिबात असेल तेव्हा. आणि मुलीची बाजू, मुलीची बाजू काय? एवढं helpless का वाटतं यांना? आणि रिस्क कुठं नसते? कुठलीही गोष्ट आयुष्यात अनपेक्षितपणे घडू शकते. जोवर आपण कुणाच्या अध्ये-मध्ये नाही, कोणाचं नुकसान करत नाही, तोवर का कोणाला घाबरायचं? जर आयुष्य सुखात चालू असेल तर कशासाठी हाताचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं? हां, आता अचानकपणे कोणी आलंच आयुष्यात तर त्याबाबतीत विचार नक्की करेन मी पण जे चाललाय ते चालू द्या ना सुखाने.
कधी कधी वाटतं, एवढं केलं आई-बाबांनी आपल्यासाठी, मी त्यांची एक साधी गोष्ट ऐकू शकत नाही? पण मला वाटतं, मी पुढे शिकून, स्वतःच्या पायावर उभी राहीन आणि काहीतरी fundu करेन ना, जेव्हा आख्खं जग माझं कौतुक करेल, तेव्हा त्यांना किती अभिमान वाटेल माझा. पण त्यांना हे का कळत नाही की या सगळ्यासाठी मला त्यांची गरज आहे. त्यांच्या सपोर्ट ची. अशा वेळेस मला "सरीवर सर" मधली मधुरा वेलणकर आठवते. तिलाही हेच हवं असतं घरच्यांचा सपोर्ट. खरंच आपल्या माणसांचा सपोर्ट असेल तर कोणीही काहीही करू शकतं. जो सपोर्ट माझा नवरा मला लग्नानंतर देईलच असा हे म्हणताहेत, तोच हे का देत नाहीत? मान्य- वय, आजारपण, मृत्यू - अटळ असणारा. ते गेल्यानंतर माझं काय होईल, कसं होईल? म्हणून नवरा? नवरा खूप वर्ष जगेल याची काय guarantee? थोडक्यात "कसं होईल, काय होईल" हा प्रश्न कायमच राहणारे. ती रिस्क तर असेलच. मग त्यापेक्षा स्वत: जर मी सक्षम बनू पाहतेय तर त्याला का नाही सपोर्ट? त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की मी काय वाट्टेल ते achieve करू शकते. खरंच.

19 December, 2009

मुलांची शिक्षणं.. मुलींची लग्न..


आज तिने एक बातमी वाचली.. रेमंड कंपनीबद्दल... ती कंपनी आता बंद होणार वगैरे. त्यात असा लिहिलं होतं - "लोकांपुढे आता काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्या कुटुंबाचं कसं होणार.. मुलांची शिक्षणं व्हायची, मुलींची लग्न व्हायची".. इतक्या वेळेपर्यंत कंपनीबद्दल आणि त्या लोकांबद्दल काळजी करणारी ती, या वाक्याला एकदम थबकली. तिला टी.व्ही. वर पाहिलेली एक जाहिरात आठवली. कशाची ते काही नीट आठवेना - कदाचित लाईफ इन्शुरंस किंवा तशीच कोणतीतरी.. ज्यात नीना कुलकर्णी आहे ती.. आणि त्यातलं एक वाक्य हि एकदम तिच्या मनात उमटलं.. "मुलांची शिक्षणं, मुलींची लग्न.. या सगळ्यात मला याचीच तर मदत झाली.." या अर्थाचं.. त्यानंतर मात्र बातमीमध्ये लक्ष लागेना.

ती विचार करू लागली.. तिच्या घरी लहानपणापासून मुलगी म्हणून कोणतीच वेगळी वागणूक जास्त प्रमाणात दिली गेली नव्हती. बाबा तर तिच्यावर खुश असायचे, तिच्या प्रत्येक कामाबद्दल, मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना अभिमान वाटायचा. क्वचितप्रसंगी सर्वांसमोर म्हणायचेदेखील.. "आमचा मुलगाच आहे हा.. आमची मान ताठ ठेवणार.. नाव मोठ्ठं करणार" शाळा-कॉलेजमध्ये असेपर्यंत आईसुद्धा तिच्या अभ्यासावर नीट लक्ष ठेवून असायची. हे सगळं तिला आठवलं. ती स्वत:ला म्हणाली.. "माझे आई बाबा वेगळे आहेत. ते असा विचार करणार नाहीत." पण तेवढ्यात तिला जाणवलं, गेल्या काही वर्षात हा आनंद, अभिमान कमी झाला नसला तरी पूर्वीइतका उत्साह मात्र दिसून येत नाही. आणि मग ती भानावर आली. "मुलींची लग्न" शेवटी मुलांची ती शिक्षणं आणि मुलींची ती लग्न.. हेच का ते आयुष्याचं ध्येय?

मनाची एवढी क्षणमात्र चलबिचल झाली खरी पण तरीही "Be the change you want to see in the world" असं म्हणून ती स्वत:शीच एकटीच हसली आणि तिनं पेपरचं पान उलटलं.

(Picture taken from wiki.)

13 August, 2009

dumbC - एक चिंतन !

हा खेळ म्हणजे माझा वीक पोइंट! हा खेळ नियमीतपणे खेळलाच पाहिजे असा जणू काही नियम असल्यासारखा मी अधून मधून खेळत असते... अर्थात, एकटी नव्हे... सगळे कलाकार गोळा करून... लहानपणापासून हा खेळ मी वेगवेगळ्या लोकांसोबत खेळत आले आहे... पण सगळ्यात जास्त एन्जॉय केलेला खेळ म्हणजे आई. आई. टी. मधला... तर सुरुवातीला माझ्या ह्या टीम मधल्या कलाकारांची ओळख...

१ - अमिता - आम्ही खेळतो तेव्हा या खेळाचा एक नियम असतो, तो म्हणजे मी आणि अमिता एकाच टीम मध्ये असणं जरुरिचं आहे... ;) मग आम्ही कोणालाही हरवू शकतो...! या खेळात दुसर्याच्या आवडीनिवडी माहीत असणं, फार महत्वाचं असतं... म्हणुनच मी सांगते ते अमिता ला लगेच समजतं आणि तसच तिचं मला.. जसं की तिला फेडरर आवडतो किंवा हेरी पोटर ची सगळी पुस्तकं तिची आवडती आहेत अशा व्यक्ति-सापेक्ष गोष्टींचा प्रचंड फायदा होतो... कधी कधी मात्र काहीच कळत नाही मग गरज पड़ते ती सायली ची...

२ - सायली - हा खेळ खेळताना सगळ्यात जास्त वेळ आणि जास्त शब्द जर कोणी बोलत असेल तर ती सायली... एक्टिंग करणारा समोर जाउन खोकला किंवा शिंकला तरी ही मुलगी त्यावरून नाव काय असेल याची बडबड सुरु करणार... आणि कधी कधी तर ती इतकं बडबडते की "बाई, आता गप्प बस... तू फारच विषयांतर करत आहेस" असं एक्टिंग करून सांगायची वेळ येते... पण सायली ची गुणवत्ता इतकी प्रचंड आहे की तिला हिंदी सिनेमातलं ओ की ठो कळत नसून देखिल ती बरोब्बर ओळखते... त्यामुळे सायली हुकुमाचा एक्का आहे! ;)

३ - रोझ - या मुलीचं वैशिष्ठ्य म्हणजे तिच्या डोक्यात एक इन्फायनाईट मेमरी असणारा इंडेक्स आहे... ज्यामुळे इंग्रजी आणि मलयाळम या २ भाषा आणि सुपर फास्ट स्पीड ने शिकलेली मराठी याची अशी काही सांगड ही घालते की त्यासमोर भल्या भल्यांची वाट लागते... तिच्याकडे एकाच गोष्टीचा वेगवेगळ्याप्रकारे आविष्कार करण्याची कला आहे... त्यामुळे तीसुद्धा कोणताही सिनेमा इन-एक्ट करू शकते आणि उर्दू शब्द नसणारा कोणताही सिनेमा ओळखु शकते!

४ - नम्रता - ही मुलगी मात्र नेहमी "खयालोंमे खोयी" असते... समोर प्रचंड ओब्विअस असा अभिनय केला तरी ही मुलगी वाकड्यात शिरते... ;) आणि लई वेळ लावते ओळखायला... पण तिचे काही काही गेसेस आणि कोमेम्ट्स अतिशय डेंजर असतात... बापरे!

५ - सुजेषा - ही नेहमी समोरच्याला वाटतं त्याच्या बरोब्बर उलटं करते... जसं की आता मला आणि अमिताला वाटलं की चला आपण हा सिनेमा देऊ ज्याचं नाव सुजेषा नक्की ओळखु शकणार नाही की अशा वेळेस ही मुलगी नक्की म्हणजे नक्की नाव ओळखणार... :( मग आमचं एव्हढं भारी प्लानिंग गंडणार... :( :(

६ - मी स्वत:- मी कोणतीही गोष्ट इन-एक्ट करू शकते... इंग्रजी सिनेमांची नावं कितीही भयानक असू देत... त्यांचा अर्थ मला कळो वा न कळो... त्यांचा शुद्ध मराठीतला उच्चार मला कळला की झालं काम... हिंदी, मराठी आणि इंग्रजी आशा तीनही भाषांच्या समृद्ध अशा शब्दसंग्रहाचा मी अतियोग्य रितीने वापर करून घेते... आणि सिनेमाचं नाव ओळखता येतं म्हणजे काय! नक्कीच येतं!

काही कलाकारांची नावं लिहायची राहिली खरी पण कसंय ना, त्यांच्यातले गुण एवढे भारी आहेत की मला त्याचं वर्णनच करता येई ना.. मग आहे ना आमची टीम लई भारी!! मग अनलिमिटेड मजा येतेच येते! म्हणुनच वेळ मिळो अथवा न मिळो... जागरण करायला लागलं तरी चालेल... पण आम्ही खेळणार म्हणजे खेळणारच!!!!

dumbC या खेळाचे काही फायदे -
१ - प्रचंड मानसिक व बौद्धिक व्यायाम होतो
२ - दुसर्याच्या मनात काय चालु आहे हे ओळखायची प्रेक्टिस होते
३ - चिकाटी वाढते
४ - एकाच गोष्टिकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पहायची सवय होते
५ - जनरल नोलेज लई म्हणजे लई च वाढतं... फ़क्त सिनेमांची नावच नव्हे तर एक्टिंग बघतानासुद्धा इतक्या नव-नवीन गोष्टी माहीत होतात की काय सांगू!

:D

12 August, 2009

स्वाइन फ्लू का? बर...

सध्या सगळीकड़े जोरदार चर्चा सुरु आहे ती स्वाइन फ्लू ची... मी अजुनही या बाबतीत लई थंड आहे... म्हणजे "बर... स्वाइन फ्लू का... बर मग मी काय करणं अपेक्षित आहे?" - असं.... "काळजी घ्या" असं लोकांचं हजार वेळा सांगून झालं... आजकाल लोकांचं वर वर का होईना ऐकायचं असं ठरवल्यामुळे "बर" म्हटलय खरं मी पण काळजी घ्या म्हणजे काय करा? हे काही मला माहीत नाही... असो...

पण या तथाकथित भीतिमुळे माझ्या डोक्यात लगेच कीडे वळवळायला लागले... समजुन चालु की उद्या मलासुद्धा स्वाइन फ्लू की काय तो (किंवा कोणताही तत्सम, जीवघेणा वगैरे आजार) झाला... तर मी काय करेन? आशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला "टाटा, बाय बाय" म्हणण्याआधी करायच्या आहेत? कसंय ना... मरण काही अवधी देत नाही असा विचार करायला... की बाबा रे... घे तुला मी १० दिवस देतो... कर तुला काय हवय ते... आणि मग चल माझ्यासोबत... :D म्हणुन म्हटलं... या निमित्ताने तरी का होईना... एकदा विचार तरी करून बघू...

तर हे सगळं मी माझ्या एका मित्राला सांगत होते... त्याने मला वेड्यात काढलं! म्हणे..."sometimes you are too much!" मग मी विचार केला, खरच का मी वेड्यासारखा विचार करतेय? मरण - जी अटळ गोष्ट आहे... जन्म आणि मरण या दोनच निश्चित घटना माणसाच्या आयुष्यात असताना, असं कसं कोणीच कधी त्याबद्दल बोलू देत नाही? माझा मते मरण काही तितकसं भयानक वगैरे नसावं... त्यानंतर इतरांचं आयुष्य मात्र भयानक होवू शकतं, पण ते सुद्धा काही काळासाठीच... म्हणजे बर्याचदा आपण एखाद्या गोष्टीच्या परिणामांनाच जास्त घाबरून असतो... त्या गोष्टिपेक्षा... असो...

तर मुद्दा असा की मग मी विचार करायला लागले... काय काय बरं करावं? तर केवढं काय काय सुचलं... सगळ्यात पहिलं सुचलं ते म्हणजे माझं MTP! :P जसं काही मी नाही तर त्याला वालीच नाही... हे..हे... मग बरंच काही काही सुचत राहिलं... काही मुद्दामहून विसरलेली माणसं आठवली... ज्यांना एकदा तरी पुन्हा भेटावं असं वाटलं... मग वाटलं... अरे, काल त्या मित्राशी उगीच भांडले... त्याच्याशीसुद्धा एकदा बोलून घेवु... असं लई काय काय सुचायला लागलं...
थोडक्यात काय तर आधी किम्मत न केलेल्या गोष्टी आता फारच अमूल्य वाटू लागल्या... पण कसंय ना... माणसाचा इगो त्याच्या सोबतच जातो कदाचित... त्यामुळे या सगळ्या गोष्टींपैकी अगदी थोड्याच मी तात्पुरत्या शोर्ट-लिस्ट केल्या आणि सरळ कामाला लागले... एक मात्र खरं, की त्यामुळे मला कामाचं अजुन एक मोटिव्हेशन मिळालं... हे ही नसे थोडके...

20 July, 2009

विडंबन - १

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा ||ध्रु||

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा ||१||

या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा ||३||
(येथून उचललं आहे - पहिलं आणि तिसरं कडवं)

"हा खेळ सावल्यांचा" या चित्रपटातलं हे गीत... मी जेव्हा पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला / गाणं ऐकलं, तेव्हा माझ्या बाबांनी मला त्याचं विडंबन कसं करता येइल याची एक मस्त आयडिया ची कल्पना दिली होती - ते नेहमी शेवटची ओळ म्हणताना - "हा खेळ चावण्याचा..." असं म्हणायचे...

आज खूप वर्षांनी मला याचं थोडंफार विडंबन सुचल्यासारखं वाटतंय... ते असं...

पावसाळ्यात खेळ चाले, या डास-प्राणियांचा
संपेल ना कधीही, हा त्रास चावण्याचा ||ध्रु||

हा डास ना गरीब, मलेरिया वाहतो हा
पावसात माणसांच्या, शिव्या शाप भोगतो हा
आजारास होई कारण, हा डास एव्हढास्सा ||१||

या मस्त पावसाळी, का त्रस्त चेहरा हा
odomos लावुनिया, जा झोप शांत आता
येइल निवांत झोप, आता मच्छरदाणीत||३||
आशा आहे की हे इतकंही वाईट नसावं की तुम्ही मला चावायला उठाल... :P

18 July, 2009

नए नए से दर्द की तलाश में...

माझं खूप वेळा असं झालंय... की एखादा वाईट अनुभव येतो, मी प्रचंड दु:खी होते... चिडचिड करते... आणि काही दिवसांनी माझ्या लक्षात येतं की मी पुन्हा त्याच मार्गावर चालले आहे... पुन्हा तसाच अनुभव येणार आहे... आणि कधी कधी तर असं वाटतं की मी त्या अनुभवाची वाटच बघत होते... माझा एक मित्र मला म्हणायचा- "स्वत:चं दु:ख कुरवाळत बसू नकोस..." पण बहुतेक मला तेच करायला आवडायचं... आता हळुहळु त्याचं म्हणणं पटायला लागलंय...

कित्येक लोकांबाबत मी पाहिलंय की त्यांना ते करत आहेत त्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे हे व्यवस्थित माहीत असतं... कारण तो अनुभव त्यांनी घेतलेला असतो एकदा... पण तरीही ते तोच मुर्खपणा करायला जातात खरं !! (हे मी सुद्धा केलेलं आहे...) की त्यांना तरीही त्यातून वेगळं काही मिळेल अशी आशा असते ?? (मला तरी होती, :D) कोणास ठाउक...! "उम्मीद पे दुनिया टिकी है" - म्हणतात, तसंच काहीतरी असावं...

नेमकं हेच स्वानंद किरकिरेंनी "खोया खोया चांद"च्या शीर्षक गीतात फार सुरेख मांडलं आहे...

ये खुश नही जो मिला,बस मांगता ही है चला...
जानता है, हर लगी का दर्द ही है इक सिला...
क्यूँ नए नए से दर्द की फिराक में, तलाश में उदास है दिल...
क्यूँ अपने आप से खफा खफा, जरा जरासा नाराज है दिल...

16 July, 2009

प्रेझेण्टेबल

सकाळीच हा लेख वाचला...
http://beta.esakal.com/2009/07/15150534/entertainment-aditi-sarangdhar.html

त्यात शेवटी असं लिहिलेलं आहे...
बेसिक मेकअप कसा करावा याची प्रत्येक मुलीला माहिती असणं आज काळाची गरज बनली आहे. प्रेझेण्टेबल दिसणं खूप आवश्‍यक असतं.
आणि मग हा लेख वाचला...
http://beta.esakal.com/2009/07/16165027/features-on-self-help-group.html

फोटो मधल्या त्या साध्या, सावळ्या, "मेकअप" ची माहिती नसलेल्या पण चेहर्यावर समाधान आणि हसू असणार्या बायका!!

08 July, 2009

चिऊ!

आज सकाळचीच गोष्ट.. मेस मध्ये न्याहारीला गेले. उपमा पाहून तोंड वाकडं केलं. डिश भरून घेवून आले. खिड़कीजवळच्या टेबल वर जाऊन बसले. अचानक चिवचिव ऐकू आली. समोर पाहिलं तर खिडकीत चक्क चिमण्या!! तशी मेस मध्ये बऱ्याच वेळेस एखादी चिमणी दिसते पण आज चक्क ४ चिमण्या!! त्यातली एक खिडकीच्या दारावर येवून बसली, तिचा उपमा आवडीचा असावा, कारण खिडकीत उपम्याचं एक ढेकूळ सांडलं होतं, (आता ते तिथे कसं सांडलं, ते माहीत नाही किंवा कोणीतरी मुद्दाम तिथे ठेवलं असेल, चिमण्यांसाठी :) ) तर ती तिथे खाली आली आणि मस्त उपमा खाऊ लागली, १०-१५ सेकंदं खायची, चोचीने हळूच एवढासा रव्याचा दाणा खात असेल! आणि मग वर बघून चिवचिव करायची! काही वेळाने तिकडे दुसरी चिऊ आली, आणि काय मजा! ही पहिली चिमणी चक्क थोडीशी बाजुला झाली! मग त्या दुसऱ्या चिऊला मस्त ऐसपैस जागा मिळाली उपमा खात बसायला!
असं १ मिनिटभर चालु होतं, थोड़ा उपमा खायचा आणि जरा वेळ वर बघून चिवचिव करायची! मग त्यातली पहिली चिमणी उडून वर खिडकीच्या दारावर गेली, तिकडे अजुन २ चिमण्या बसल्या होत्या, ती तिकडे जाउन पण चिवचिव करून आली, आणि काय मज्जा! २ क्षणातच त्या २ चिमण्या खाली आल्या आणि उपमा खाऊ लागल्या! आणि आधीच्या चिमणी लगेच बाजुला सरकली! मग थोड्या वेळाने ती उडून गेली!
मग मला त्या चिवचिवाचा अर्थ कळला, आधी वर पाहून चिवचिव करणारी चिमणी कदाचित तिच्या मैत्रिणिंना बोलावत असेल उपमा खायला... त्या बधिर आहेत, त्यांना कळत नहिए, असं लक्षात आल्यावर मग ती स्वत:च उडून वर जाउन बसली, तिकडे पण चिवचिव करून त्यांना - जा खाली उपमा आहे असा सांगितलं असणार नक्कीच! त्याशिवाय का त्या दोघी लगेच खाली आल्या! आणि मग ती दुसरी चिमणी उरलेला उपमा त्यांच्यासाठी ठेवून उडून गेली!
असा अंदाज लावत लावत माझा उपमा कधीच संपून गेला! आयुष्यात पहिल्यांदा मी न्याहारिचा उपमा एन्जॉय केला असेल!

02 June, 2009

मजेशीर मन आणि मी!

परवा पुण्याहून बसने येत होते. माझं २.४५ च्या गाडीचं बुकिंग होतं, ती बस ३.१५ झाले तरी स्वारगेट ला आलेली नव्हती. त्याचसुमारास ३ वाजता निघणारी बस आली. मी कंडक्टर सोबत बोलुन माझं तिकीट या बस ला अड्जस्ट होइल का अस बघत होते. त्या काकांनीसुद्धा लगेच मान्य केलं आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. काही वेळाने बस कोथरुडला आली आणि तिकडे एक आजीबाई २ पिशव्या घेवून तिकीट नसल्यामुळे प्रत्येक बस मध्ये जागा आहे का ते बघत होत्या. माझं एक मन म्हणालं, मी राहिले असते उभी आणि त्यांना जागा दिली असती तर त्यांना थांबावं लागलं नसतं स्टॉपवर. मग तर असही मनात येवून गेले की मी जर या बस ने आलेच नसते तर त्यांना जागा मिळाली असती. त्याचवेळेस माझं दुसरं मन मला सांगू लागलं - तुझी बस वेळेत आली नाही ही तुझी चुक नाही. ते होणं तुझ्या नशिबात होतं. पण आता जी बस मिळाली आहे तुला ती ही तुझ्या नशिबात होती म्हणुनच नाहीतर या बस मध्ये जागाच नसती तर? किंवा त्या कंडक्टरनं तुझं ऐकलं नसतं तर? त्यामुळे तू स्व:ताला अपराधी वाटुन घेवू नकोस. त्या आजींना ही त्यांच्या नशिबात असेल तेव्हा बस मिळेल..

आणि मजा म्हणजे दुसऱ्या मनाने सांगितलेलं मला अगदी लगेच पटलं..!!

19 October, 2008

गूगल!!

मला गूगल मध्ये नोकरी मिळाली आहे! मी बंगलोरला आले आहे, इकडे उमाला भेटले. तिला म्हटलं, मला गूगल कुठे आहे हे माहीत नाहीए.. तर ती मला म्हणाली, अग, गूगल ना, याहू च्या अगदीच जवळ आहे. तू माझ्यासोबत चल, मी तुला सोडते गूगल मध्ये.. मग आम्ही निघालो.. जाताना H11 च्या गप्पा मारत चालत आहोत.. जाताना मला आजुबाजुची दुकानं ओळखीची वाटत आहेत, मी उमा ला म्हटलं, अग इथे आधी कधीतरी येवून गेल्यासारखं वाटतय गं, तर उमा मला म्हणते, अग तू बंगलोर ला होतीस ना काही दिवस, आली असशील कधी तरी या भागात.. मी म्हटलं, हं.. शक्यता आहे.. ज़रा चालल्यावर उमा मला म्हणते, आता ह्या बिल्डिंगच्या दुसऱ्या बाजुच्या दरवाज्यातून तू बाहेर पडलीस ना, की गूगल ची बिल्डिंग समोरच दिसेल तुला.. मी म्हटलं, ठीक आहे मग, भेटू संध्याकाळी.. मग मी त्या बिल्डिंगमध्ये शिरले, पाहते तर काय! ती तर I.I.T. ची main building होती! म्हटलं, ही इथे कुठे आली!!??!! विचार करता करता दुसऱ्या दरावाज्यापाशी पोहोचले, समोर गूगल ची बिल्डिंग! मग आत गेले, नविन काम मिळालं॥ सगळ्यांशी ओळख झाली, मग माझ्या cubicle मध्ये गेले.. TL सोबत ओळख झाली नाही फ़क्त.. तेवढयात माझा teammate म्हणाला, there comes the TL! मी पाहते तर समोर अतुल कुलकर्णी उभा!! हा? TL? !! wowww!! :) त्याच्याशी ओळख झाली, मग कामाला सुरुवात....!

सकाळी उठल्यावर लक्षात आलं, की तो परिसर माझ्या पुण्याच्या घराजवळचा होता.. म्हणुन ओळखीचा वाटत होता!

(हे वाचणार्यांना गूगल मध्ये नोकरी लागल्याची पार्टी देणार नक्की!! पण स्वप्नात च! :P)

15 March, 2008

मला नाही मिळाल..

एखादी गोष्ट जेव्हा मिळवण्याची इच्छा असते किव्वा त्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात, ती मिळाली नाही कि माणसाची काय प्रतिक्रिया असते?

माझ्यापासून सुरुवात करते.. मी हळहळते.. त्या गोष्टीच नेहमी दु:ख करत बसते.. आठवण काढत राहते.. मला का मिळाल नाही याचा विचार करत माझा वर्तमानातला वेळ वाया घालवते.. :-((

इतर लोक काय करतात, बघु तरी.. अस म्हटल, तर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसल्या.. खूप कमी लोक माझ्याप्रमाणे हळहळणारे होते.. उरलेले अस म्हणणारे होते कि..
".... नाही नाही.. त्या गोष्टीत काही राम नाहिए.. (समजा ती गोष्ट म्हणजे एखद्या अभ्यासक्रमासाठी मिळणारा प्रवेश असेल, तर..) तो अभ्यास्करम करून काही फायदा होत नसतो.. ज्यान्ना इतर काही करत येत नाही ते तो अभ्यासक्रम घेतात.. "

इत्यादि.. इत्यादि.. आणि अशाच प्रकारची त्या गोष्टिच्या विरोधात अनेक वाक्य..

अशी लोक डोक्यात जातात माझ्या.. मान्य आहे, नसलेल्या गोष्टीसाठी हळहळत बसणे, त्यासाठी सध्याचा वेळ फुकट घालवणे हा मूर्खपणा आहे.. पण या लोकान्च्या प्रतिक्रिया ऎकून मला ते ढोन्गी वाटु लागतात.. ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केले ती अचानक बिनमहत्वाची, फालतू कशी काय वाटू शकते? कि स्वत:ला नाहि मिळाल / मिळवता आल म्हणुन आपल्या सोयीने त्याची किम्मत ते ठरवतात?
मग पुर्वी या लोकान्चे कष्ट आणि प्रयत्न पाहून मला जो अभिमान वाटायचा तो आता रागात बदलून जातो.. स्वत:च्या (खोट्या) समजुतीखातर ते नकळत ती गोष्ट ज्यान्ना मिळाली त्यान्चा अपमान करतात अस मला वाटायला लागत.. dishonest, fake people!!

खर तर या दोन्ही टोकाच्या भुमिका झाल्या.. दु:ख न करण आणि आपल्या सोयीनुसार किम्मत ठरवुन दुसरयाचा अपमान न करण, हाच खरा शहाणपणा!