18 May, 2011

मशीद

मला रस्त्यावरुन चालत / गाडी चालवत जाताना आजुबाजुला दिसणार्या देवळांकडे पाहुन नमस्कार करायची सवय आहे. हो, सवयच म्हणावं लागेल! म्हणजे कित्येकदा तर ते मंदीर नक्की कुठल्या देवाचं आहे हे ही माहित नसतं पण सवयीनं हात कपाळाकडे जातो किंवा मान झुकतेच. रोज ऑफिसला जाता येता मला किमान १५ देवळं तरी दिसतात. आणि हो.. एक मशीद सुद्धा दिसते. खरतर मशीदीमधली प्रार्थना (हो, नमाजच. पण इथं आधी लिहिल्याप्रमाणे खरच दोन्ही सारखंच तर आहे!) खूप वेळा कानावर पडते. कित्येकदा आत जावसंसुद्धा वाटतं पण नाहीच गेले कधी! असो!

तर  ही रोज दिसणारी मशीद. अगदी सिग्नलच्या चौकात आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेला तर हमखास मी सिग्नलला थांबलेली असताना सगळं लक्ष मशीदीकडेच जातं. बुरखाधारी बायका त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेवून लगबगीनं आत जात असतात. एखादा भिकारी मशीदिच्या दारात लोकांकडे आशेने बघत बसलेला असतो. बाईकवरुन आलेला एखादा तरूण आत जाताना मात्र डोक्यावर पांढरी टोपी घालत असतो. कुठल्याही देवळाबाहेर असेल असंच दॄश्य!

एक दिवस सिग्नलला थांबलेली असताना अचानकच मी नमस्कार केला. मशीदीकडे पाहुन. मग ती हि सवय लागली. काल त्या सिग्नलला आल्यावर ब्रेक लावणार गाडीला इतक्यात समोरच्या गाडीवर मागे बसलेल्या एक खेडवळ बाईकडे लक्ष गेलं. ती - साधंसं सुती लुगडं, कपळावर लाल कूंकू, सावळा रंग - ती हात जोडत होती - मशीदीकडे पाहुन. का कुणास ठावुक, पण फारच भारी वाटलं!