गेल्या काही दिवसांपासून मी "पैसे बचाव" अभियान सुरु केलंय. अर्थात अभियान म्हटलं असलं तरी त्याची व्याप्ती माझ्यापुरतीच आहे. म्हणजे काही गोष्टींमध्ये पैसे उगीचच खर्च करायचे (की उडवायचे?) नाहीत असा नियमच बनवून टाकलाय. उदाहरणार्थ - बऱ्याचवेळेस बाहेरचं खाल्लं जातं - त्याला काटछाट - किंवा एखादी आवडलेली वस्तू (बऱ्याचदा) गरज नसली तरी घेतली जाते तसं न करणं वगैरे. एक साधारण मध्यमवर्गीय, म्हणजे खाऊन पिऊन सुखी कुटुंब लक्षात घेतलं तरी कित्येकदा त्यामागे त्याकरिता आई-बाबांनी केलेल्या अडजस्टमेंट्स असतात. जसं जसं आपण अधिकाधिक स्वतंत्र होऊ लागतो, स्वत:च्या पायावर उभे राहतो आणि बऱ्याचवेळेस या गोष्टीने समाधानी असतो की आता आपल्या पालकांना आपल्यासाठी खर्च करावा लागत नाही; त्याच आनंदात आणि उत्साहात आपण कदाचित थोडा जास्तच खर्च करू लागतो! म्हणजे आज काल थोड्याफार फरकाने असंच दिसून येतं की, साधारण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालं की रग्गड पगाराची नोकरी - मग ती कुठेही असो - आणि मग त्यासोबत आलेलं financial freedom. २५-२६ व्या वर्षी जेव्हा आपली आधीची पिढी नोकरीने स्थैर्य आलं की संसार थाटायची तिथे आपल्या पिढीतले बहुतांश लोक घर किंवा गाडी मध्ये फक्त स्वतःच्या हिमतीवर गुंतवणूक करू लागले - अशी गुंतवणूक आपल्या आधीच्या पिढीने over the years केलेली दिसते. अगदीच एखादा नोकरी ऐवजी शिकत असला तरीदेखील ज्या तुलनेत आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांना पैशाचा स्वातंत्र्य असे, त्यामानानं आपल्या पिढीला खूपच जास्त आहे.
माझ्या स्वतःच्याच बाबतीत मी याचं विश्लेषण केलं. घरी असायचे तेव्हा रोज नेहमीचं पोळी-भाजी-भात आमटीचं जेवण - केव्हा केव्हा चटणी/कोशिंबीर/पापड.. सणासुदीला पक्वान्नं आणि कोणी पाव्हणे असले तर काही विशेष.. म्हणजे फार फार तर पुलाव / बिर्याणी अशा व्हरायटीज किंवा पोळीऐवजी एखाद वेळेस पुरी.. पाव भाजी किंवा पिझ्झा किंवा तत्सम पो.भा. प्रकारात न मोडणारे so-called one dish meal म्हणजे डोक्यावरून पाणी. पण जे काही जेव्हा केव्हा केला जायचं त्यात काय मजा असायची! म्हणजे मला आठवतंय, असाच घरी एकदा काहीतरी समारंभ होता आणि मला काकडीच्या कोशिंबिरीसाठी काकडी कोचायचं काम दिलेलं! मला काकडी कोचायाला फार आवडतं :D त्यामुळे साहजिकच मी ते अगदी मन लावून करते. तेव्हा माझी आजी प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगत होती - बघा, किती छान कोच्तेय काकडी - अगदी बारीक, कुठेही मोठ्या फोडी उरल्या नाहीएत - वगैरे वगैरे.. :D तसंच एकदा फ्रुट-सलाड करताना जी फळांची टरफलं आणि साली फेकून दिलेल्या त्यात कुठलीशी चीजवस्तू (कात्री किंवा सुरी वगैरे) देखील फेकून दिली गेलेली - म्हणजे ती वस्तू काही नंतर सापडली नव्हती :D असो! तेव्हा खरोखर असेल त्यात समाधान मानण्याची वृत्ती होती. नशिबाने अजून देखील घरातले लोक तसेच आहेत - मृगजळामागे न धावता, आहे त्यात सुखात राहणारे; पण मग कधी कधी मीच बदललेय की काय असं मला वाटू लागतं!
घरापासून दूर राहायला लागल्यावर एक गोष्ट फार अंगवळणी पडू लागते - ती म्हणजे आपण एकटे पडू लागलोय असं वाटलं की कितीही नापसंत लोकांसोबत जुळवून घ्यावं लागतं - म्हणजे एकटेपणापेक्षा ते बरं - असं! मग कधी त्या मित्रांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा आपल्यालाच सवय होऊन जाते म्हणून म्हणा - आपण खूप पैसे उडवू लागतो - म्हणजे वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पासून ते नोकरीच्या सेलिब्रेशनपर्यंत. आज काल जसं लहान मुलांच्या ग्रुप्समध्ये बर्थडे गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट अशी एक प्रथा (?) निर्माण होऊ घातलीये, तसंच काहीसं आपल्याही बाबतीत होतं. म्हणजे २ ऑप्शन्स असतात. पहिला म्हणजे आपल्या मनाविरुद्ध (बऱ्याचवेळेस)- "त्याने नाही का त्याच्या बर्थडेला मोठ्ठी पार्टी दिली? मग मला द्यायला नको का?" असं कारण देवून आपण हे आपल्या अंगवळणी पाडून घ्यायचं; आणि दुसरा ऑप्शन म्हणजे या सगळ्यापासून चार हात दूर राहायचं. मी दुसऱ्या मार्गाचा अवलंब कित्येक वर्षं केला; मध्ये काही वर्षं पहिल्या मार्गाकडेदेखील वळले पण लवकरच दुसरा मार्गचं योग्य वाटू लागला आहे पुन्हा एकदा. याचं कारण माझं मी केलेलं विश्लेषण. अगदीच ढोबळमानानं सांगायचं झालं तर फक्त मेसच्या जेवणाचा कंटाळा म्हणून मी कित्येक वेळा बाहेरच खाते. पण मग त्यातही बऱ्याच वेळेस भुकेपेक्षा जिभेचे चोचले पुरवणचं अधिक होऊन बसतं! म्हणजे असं लक्षात यायला लागलं कि मेस मध्ये नको म्हणून बाहेर एखाद्या ठिकाणी पोळी-भाजी मिळत असूनदेखील मी पिझ्झा ऑर्डर करू लागले. यात खर्चदेखील वाढला. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मला मी १.५ महिन्यात जवळ जवळ २००० रुपये फक्त खाण्या-पिण्यावर खर्च केले असं लक्षात आलं तेव्हा फार अपराधी वाटू लागलं. आणि तेव्हा लक्षात आलं कि मी कळत-नकळत पहिल्या मार्गाचा अवलंब केला होता - सवयीनं! म्हणून मग पैसे बचाव या नावाखाली पुन्हा एकदा एक balanced आयुष्य सुरु करायचं ठरवलं.
मला खात्री आहे की प्रत्येक असा माणूस जो मित्रांसोबत किंवा घरापासून दूर राहतो, तो थोड्या-फार फरकाने असाच करत असणार (जे नाहीत, त्यांचा खरच कौतुक!) म्हणजे खाण्यावर नसेल कदाचित पण पिक्चर म्हणा / कपडे म्हणा / भटकणं म्हणा.. कोणतीतरी गोष्ट नक्कीच प्रमाणाबाहेर करत असणार. कधी कोणाच्या आग्रहाखातर किंवा कधी आपोआप सवय होऊन गेली म्हणून. अर्थात पैसे कसे आणि किती खर्च करायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे; पण given that you belong to a middle class family, कुठेतरी मनात हे कायम टोचत राहतं की ज्यांनी आपल्याला या लायक बनवलं त्यांना अजूनही त्याच परिस्थितीत ठेवून आपण मजा मारतोय. यात अजून एक गोष्ट देखील असते. बर्याचदा असं होतं की आपली आधीची पिढी तेवढी flexible नसते - उदाहरणार्थ, समजा तुम्ही ठरवलं की आपण आपल्यासाठी कपडे घेण्यावर एवढे पैसे खर्च करतो, आई साठी एक मस्त भारीतली साडी घेऊ- पण साडी दिली की तिची दुसरी रियाक्शन अशी असते की - केव्हढी महाग आहे - काय साड्या कमी आहेत होय मला? (अर्थातच पहिली रियाक्शन - वाः छान आहे, आवडली - अशीच असते :)) किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना महागड्या हॉटेलात बर्थडे ट्रीट दिली म्हणून तुम्ही आई-बाबांना म्हणालात की चला आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरी काही करण्यापेक्षा आपण पिझ्झा मागवू - तर ते बऱ्याचदा नाहीच म्हणतील. त्यांची आपल्याकडून यातली कुठलीच अपेक्षा नसते. आणि मग कधी कधी त्यांच्या या rigidness ला कंटाळून म्हणा किंवा काहीही, आपण आपल्याच आयुष्यात हे सगळे करत राहतो. पण मग आपलेपणाची मजा गमावून बसतो. सगळ्यांसमोर नातीचं कौतुक करणारी आजी miss करतो; आणि छान हसत खेळत, एकमेकांना मदत करत केलेल्या स्वयंपाकाची गोडी देखील miss करतो.
उगीच नाही, पिझ्झ्याचा समाचार घेतल्यावरदेखील "चिंच-गुळाची आमटी पाहिजे.." किंवा "मला मटार उसळ खायचिए.. आत्ता लगेच" असे स्टेटस मेसेजेस chat वर टाकत आपण! किंवा, westside / fab india मधून घेतलेले expensive कपडे सोडून traditional day ला घरून आईचीच साडी घेवून येत! उगीच नाही, कोणी गणपतीसाठी घरी गेलं की मोदकांची फर्माईश करत, आणि उगीच नाही "ही पुरणपोळी.. मराठी लोकांमध्ये करतात होळीला" असं म्हणून आपल्या समस्त अमराठी मित्र-मैत्रिणींना ती आग्रहाने खायला घालत! कधी कधी मला वाटतं, आपण अजिबात बदललो नाहीये.. आपले विचार अजूनदेखील आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाभोवातीच फिरत आहेत. :) आणि असं वाटलं की अचानक एक समाधान अनुभवायला मिळत! आपण अजिबात एकटे नसल्याचं!
9 comments:
मेघा, खुपंच सुंदर लेख... मला जास्त पटला आवडला कारण मी मध्यमवर्गीय घरातूनच आलोय... तसा आताही मध्यमवर्गीयच आहे.. आणि ते फायनांशियल फ्रिडम २५ व्या वर्षी अनुभवले आहे... एका एका वाक्यासरशी तादाम्य पावलो (काकडी कोचणे सोडुन :D )... मस्तच
धन्यवाद आनंद! लेख वाचल्याबद्दल आणि पटला, आवडला हे आवर्जून सांगीतल्याबद्दलदेखील :)
sagaLech patale. Pramanabaher kharchhee kela jato anee tu mhanalees tase atoon kasetaree hot asate.
Chhan lihile ahe.
धन्यवाद! खरच कधी कधी तर फारच जाणवतं - की आपण यातले नाही आहोत, मग आपण असा का करतोय?!
good ...
Aanand & Yawining la full Anumodan !!
@ Megha... Lekh Chaan lihila aahes !
@ Aanand --full Anumodan !
@ Megha -- Lekh Chan lihila aahes !
धन्यवाद नितीन आणि अनिरुद्ध!
lekh wachun full senti zalo .. aai chi athavan ali :) shevatacha para khoooopppp bhavla ... tu lay bhari lihite !!!
Post a Comment