"अगं, ती विड्याची पानं कुठंयेत? अरे अमोल, तरी मी म्हणत होते, सगळं नीट एकत्र छान जमवून ठेवा.. आयत्या वेळेस अशी गडबड.. पण आमचं कोण ऐकतंय!"
"अगं आजी, ही बघ इथेच आहेत.. तू उगीच tension घेऊ नको. सगळं कसं जागच्या जागी आहे.. हेहे.."
अमोल असं म्हणाल्यावरदेखील आजीची गडबड काही कमी झाली नाही. जवळपास ५० वर्षांनी घरातलं असं कार्य होतं - नातीचं लग्न! आजीला काय करू अन काय नको असं झालेलं. त्यात अलीकडे तिची तब्येतही जरा ठीक नसायचीस पण नातीचं लग्न काय ठरलं, नवा उत्साहच संचारला जणू! म्हणजे आजी लग्न करून या घरात आली तेव्हा अवघी वीस वर्षांची होती. मग पुढची ३-४ वर्ष अरुंधती चा जन्म, बालपण यात गेली.. आणि त्यातच तिच्या धाकट्या नणंदेच म्हणजे अरुंधतीच्या सुमन आत्याचं लग्न झालं.. पुढल्याच वर्षी तिच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस काही का! नाही म्हणायला केतकीच लग्न झालं पण त्यानंतर काही घरातलं असं लग्नकार्य नाही. पण आज राधेचं - तिच्या नातीचा लग्न होतं!
अरुंधती आपल्या आईचा उत्साह पाहण्यात तल्लीन झाली होती. तिला एकदा वाटून गेलं - आपल्या वेळेस ही आईला अशीच हौस असेल, पण ती कधी पुरी झालीच नाही, आता आपल्या लेकीच्या लग्नात तरी तिला आजी म्हणून मिरवू देत. तब्येत काय, वयोमानाप्रमाणे कमी-जास्त होणारच! पण एवढी खुश आहे - असू देत.. जरा गडबड केली तरी! राधा आज नेहमीपेक्षा काकणभर जास्तच सुरेख दिसत होती. तिला पाहून अरुंधतीचे डोळे भरून आले. मन अचानक भूतकाळात गेलं. पण तिनं कष्टानं त्याला मध्येच अडवलं, नव्हे समजावलं - आज राधेचं लग्न, तिने निवडलेल्या जोडीदारासोबत. या वेळेस पुन्हा त्या आठवणी नकोएत. जे झालं ते झालं, त्याने तात्पुरते परिणाम झाले, पण अरुंधती म्हणते तसं - "nothing matters in long run" आणि आता तर सगळं उत्तम चालू आहे!
"अमोल, अरे. सुमन आत्या कधी येतेय? किती उशीर!" अरुंधतीने विचारलं.
"हान, आजी, आईबाबांसोबतच येईल - निघालेच आहेत. मगाशीच फोन केलेला मी."
अमोल केतकीचा म्हणजे सुमन आत्याच्या मुलीचा मुलगा. राधेला भाऊ नाही त्यामुळे अगदी कालपासूनच अमोल लग्नाच्या तयारीत मग्न होवून गेला होता. लग्न घरच्या घरीच करायचं ठरलं होतं. अगदी (मनाने) जवळच्या लोकांनाच बोलवायचं असा राधेचं निश्चयच होता; आणि सुदैवाने तिच्या होणार्या जोडीदाराचीदेखील याला संमती होती. केशवचं कुटुंबदेखील तसं लहानच होतं. त्याच्याकडूनसुद्धा फार असे नातेवाईक येणार नव्हतेच. आणि "ओळखीच्याच" सगळ्यांनाच बोलवायचं ठरलं असतं तर मात्र एक प्रचंड मोठ्ठीच जागा लागली असती - कारण राधा-केशवच्या ओळखी फार!
आज केतकी आणि सौरभच राधेचं कन्यादान करणार होते. खरतर, कार्यक्रम छोटेखानीच होता. court marriage आजीने अगदीच ऐकला नसतं म्हणून घरच्या घरी धार्मिक विधी आटोपायचे असं! अरुंधती आज नेहमीप्रमाणेच शांतपणे सगळीकडे लक्ष देत होती. कुठे गडबड नाही, धावपळ नाही.
तिला वाटलं, आज सिद्धार्थ असता तर? त्याला किती हौस असायची सणांची / कार्याची.. तो नेहमी म्हणायचा कि आपल्या मुलांची लग्न आपण त्यांना त्यांच्या पसंतीने करू द्यायची पण एकदम मोठ्ठा समारंभ करायचा.. सिद्धार्थ खरच किती भोळा होता. साधा सरळ होता. त्याला वाटायचं, आपलं शिक्षण, संस्कार, स्थिरस्थावर नसली तरी पोटापुरता पैसा मिळवून देणारी नोकरी.. यापुढे आपलं अनाथ असणं आड येणार नाही. अरुंधतीच्या घरचे तसे समजूतदार आहेत आणि मुख्य म्हणजे अरुंधतीच्या सुखासाठी ते आपल्या लग्नाला परवानगी देतीलच. त्याच्या एका गाण्याच्या कार्यक्रमाला अरुंधती आली होती आणि तिथेच तिला तो आवडून गेला. मग गाण्यांच्या कार्यक्रमाच्या पुढे स्वतंत्र भेटी होऊ लागल्या. अरुंधती अतिशय मनस्वी. तिला तो अनाथ असूनदेखील स्वतःच्या पायावर उभा आहे याचं प्रचंड कौतुक, ती त्याला म्हणायची - तू गाण्याचा रीतसर शिक्षण सुरु का नाही करत? तुला आपोआपच त्याची आणखी जाण येईल आणि तुझा गाणं आणखीच सुंदर होईल. पण तोदेखील तितकाच मनस्वी पण प्रचंड हळवादेखील. त्याने गाणं शिकण्याचा पुष्कळ वेळेस प्रयत्न केला पण ते त्याला जमलं नाही. दर वेळेस शिकवलेली गोष्ट त्याच्या आवाजात लगेच भिनून जायची पण त्याच्या स्वत:मधून कधी काही निर्माण झालंच नाही. ताना किंवा आलाप घ्यायच्या म्हटलं की सिद्धार्थ अगदीच भांबावून जायचा. त्याला काहीच सुचायचं नाही. आधीच त्याचा स्वभाव असा की मनासारखा झालं नाही की चिडचिड करणारा.. मग त्याचा patience अजिबात राहायचा नाही आणि तो गाणं शिकणं सोडूनच द्यायचा. कित्येक वर्षांनंतर त्याने orchestra join केला होता. जिथे तीच तीच जुनी गाणी - किशोर, रफीची म्हणायचा तो. सुरेख म्हणायचा पण स्वतःहून वेगळं असं नाहीच कधी!
अरुंधतीच्या घरीदेखील त्याच्या गाण्यावर सगळेच बेहद्द फिदा होते. पण कोणाला ही कल्पना नव्हती की अरुंधती त्याच्या गाण्यासोबतच त्याच्याही प्रेमात पडली आहे. अरुंधती स्वतः गाणं शिकलेली पण आवड म्हणून. तिचं career पत्रकारितेच. अरुंधतीला मात्र नेहमी वाटायचं की तिच्या घरचे लोक सहजासहजी मान्यता देणार नाहीत सिद्धार्थला. आणि तिला तिच्या स्वतःपेक्षा जास्त काळजी होती ती सिद्धार्थची. अनाथाश्रमात लहानपणापासून लोकांच्या उसन्या मायेवर जगात आलेला सिद्धार्थ अरुंधतीमध्ये पूर्णपणे गुंतला होता. त्याच्या हळव्या स्वभावाचा विचार करताकरता तिला कधी कधी वाटायचं, जर लग्न नाही झालं तर..? हा कसा पचवेल ते सगळं?
अशातच एकदा तो दिवस आला. अरुंधती गेले कित्येक महिने लग्नासाठी टाळाटाळ करत होती.. कुठल्याही स्थळाला नाहीच म्हणत होती. कारण तिला घरी सांगण्यापूर्वी सिद्धार्थला मनाने बळकट करायचं होतं, कुठल्याही परिस्थितीत तो खचून जाणार नाही हे त्याच्याकडून वदवून घ्यायचं होतं.. मगच ते दोघं घरच्यांच्या कुठल्याही निर्णयाला सामोरे जातील - असं तिनं ठरवलं होतं. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे दोघं सिद्धार्थच्या घरी भेटले असताना तिनं हा विषय काढला. अपेक्षेप्रमाणे सिद्धार्थ प्रचंड excite झाला होता. घरी सांगायचा विषय काढताच तो प्रचंड कावराबावरा झाला, आपण अनाथ म्हणून तिच्या घरच्यांनी नाकारलं तर? - लगेचच हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर उमटला. अरुंधतीने जमेल तितक्या शांतपणे त्याला समजवायचा प्रयत्न केला. जे होईल त्याला सामोरं जावंच लागेल, खचून चालणार नाही - सर्व प्रकारे. सिद्धार्थ त्या क्षणी प्रचंड हळवा झाला. तो अरुंधतीला तिच्यात किती गुंतला आहे, how possessive he feels about her - सांगत राहिला. अरुंधतीचा पाय निघेना आणि त्या रात्रीच त्यांच्या लग्नावर कायमची फुली मारली गेली.
पुढचा आख्खा महिना अरुंधतीने प्रचंड दडपणाखाली काढला. test positive आली होती. घरी सांगणं भागच होतं आता. एक दिवस तिनं सिद्धार्थला कसबसं तयार केलं आणि घरी सांगायचा ठरवलं. सिद्धार्थ तेव्हा म्हणाला, की आता तर ते मला नाकारू शकणार नाहीत. अरुंधतीला वाटलं, या शाश्वतीसाठीच तर त्या दिवशी याने मुद्दामून असं वेड्यासारखं वागण्याचं नाटक तर केलं नाही? की एकदा अरुंधतीचा पाय अडकला आपल्यामध्ये की तिच्या घरच्यांना ऐकावंच लागेल? या विचाराने ती प्रचंड घाबरली. म्हणजे, एका अर्थाने त्याने आपलं फायदा घेतला? आणि आपण त्याच्या मनस्थितीचा किती विचार करत राहिलो? प्रचंड तणावाखाली ते दोघं तिच्या घरी आले. आणि अर्थातच तिच्या वडिलांनी केवळ अनाथ या कारणासाठी नव्हे तर त्याने आपल्या मुलीचा फायदा घेतला असा आरोप करत लग्न नाकारलं. सिद्धार्थने पुढच्या दोनच दिवसात आत्महत्या केली. आणि उरली ती एकटी अरुंधती - जिची अवस्था फक्त तिच्या आईला समजत होती. तिच्या वडिलांनी खूप वेळा सांगूनदेखील तिने ऐकलं नाही, राधेला जन्म दिला.
आणि आता तिला एकदम वाटलं, सिद्धार्थ असता तर? ज्या वेळेस त्याची प्रचंड गरज होती, ज्याच्यासाठी आपण आयुष्य पणाला लावून जगायला तयार झालो, त्याने भ्याडपणा दाखवला आणि तरीही मला आज त्याची आठवण यावी? तिच्या पाठीवर तेव्हढ्यात केतकीचा स्पर्श झाला. तिचे भरून आलेले डोळेच सगळं काही सांगून गेले. केतकी आणि सौरभने तिला खूप सावरलं होतं. त्यांनी राधेला आपलीच मुलगी मानलं होतं. आजी, केतकी, सुमन आत्या, सौरभ, अमोल आणि राधा आणि आता केशव - काय कमी होतं? सगळं उत्तम सुरु होतं!
0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment